दिल्लीपाठोपाठ बिहारमधील दारुण पराभवाने भाजपला धक्का बसला होता. त्यामुळे आसामचा विजय पक्षासाठी महत्त्वाचा आहे. ईशान्येकडील या मोठय़ा राज्यात भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. त्याला या भागात राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने अनेक वर्षे सेवा कार्याच्या माध्यमातून उभारलेले जाळे महत्त्वाचे ठरले. केंद्रात क्रीडामंत्री असलेले सर्वानंद सोनोवाल यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले होते. स्वच्छ प्रतिमा असलेल्या ५४ वर्षीय सोनोवाल यांचा फायदा भाजपला झाला. मूळचे सोनोवाल आसाम गण परिषदेचे. त्याचबरोबर आसामच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले हेमंतविश्व सर्मा हे एक विजयाचे शिल्पकार. निवडणुकीच्या तोंडावर शर्मा भाजपमध्ये दाखल झाल्याने काँग्रेसला धक्का बसला. मुळात शर्मा हे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे एकेकाळचे उजवे हात. त्यांचे पूर्ण राजकारण सर्मा सांभाळत होते. मात्र पुत्र गौरव याला मुख्यमंत्र्यांनी पुढे केल्याने संतापलेले सर्मा भाजपमध्ये आले. त्यामुळे सोनोवाल काय किंवा हेमंत सर्मा काय या मूळच्या भाजपबाहेरील व्यक्तींनीच राज्यात सत्ता आणून दिली हे एक विशेष मतविभागणी टाळली
२०१४च्या लोकसभा निवडणुकीतच १४ पैकी ७ जागा जिंकल्याने राज्य काँग्रेसकडून ताब्यात घेता येऊ शकते, असा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आला. त्यातून रणनीती आखत आसाम गण परिषद व बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंट यांच्याशी आघाडी करत भाजपने काँग्रेसविरोधी मते विभागली जाणार नाहीत याची काळजी घेतली. स्थानिक लोकांच्या अस्मिता लक्षात घेऊन भाजपने आसामी अभिमानाचा मुद्दा पुढे आणला. त्यातच बांगलादेशी घुसखोरांना रोखण्याच्या मुद्दय़ावर भाजपचा प्रचार प्रभावी ठरला. एआययूडीएफ या बद्रुद्दिन अजमल यांच्या पक्षाशी युती करण्यास गोगोईंनी नकार दिला. त्यामुळे मुस्लीम मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडून बराक खोऱ्यात फायदा झाला. त्यातच ऐंशी वर्ष पार केलेल्या तरुण गोगोईंनी पंतप्रधानांनी माझा अवमान केला हाच भावनिक मुद्दा पुढे केला. मुळात सलग पंधरा वर्षे सत्तेत असल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला. हेमंत शर्मा यांच्याबरोबर अनेक आमदार पक्षाबाहेर पडल्याने काँग्रेस कमकुवत झाली. त्याचा फायदा भाजपने उठवला. कदाचित अजमल यांच्या पक्षाशी काँग्रेसने जुळवून घेतले असते तर निकालात काहीसा फरक पडला असता.. पण राजकारणात जर तर पेक्षा उत्तम रणनीतीच्या जोरावर काँग्रेसकडून आसाम भाजपने खेचून आणले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा