आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेसने सोशल मीडिया केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवताना ईशान्य भारत आणि तेथील लोकांप्रती त्यांची उदासीनता दिसली,” असं म्हणत हेमंत बिस्वा शर्मांनी शाब्दिक हल्ला चढवला.
काँग्रेसच्या व्हिडीओतील स्क्रिनशॉट पोस्ट करत हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले, “काँग्रेसने ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट केलेल्या व्हिडीओतील भारताच्या नकाशात ईशान्य भारत गायब आहे. त्यावरून असं दिसतंय की, त्यांनी गुप्तपणे संपूर्ण ईशान्य भारताचा भाग शेजारी राष्ट्राला (चीन) दिला आहे. यासाठीच राहुल गांधी विदेशात गेले आहेत का? की त्यांनी शर्जील इमामला त्यांच्या पक्षाचं सदस्यत्व दिलं आहे.”
“मी जेव्हा ते ट्वीट पाहिलं तेव्हा काँग्रेसने ईशान्य भारत चीनला दिला की काय असं वाटलं. त्यांनी भारताचा असा नकाशा वापरला ज्यात संपूर्ण ईशान्य भारत गायब आहे. हे जाणीवपूर्वक केलेलं देशविरोधी काम आहे. ईशान्य भारतासह संपूर्ण देशातील लोकांनी याची नोंद घ्यायला हवी. तसेच त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे,” असंही हेमंत बिस्वा शर्मा यांनी म्हटलं.
हेही वाचा : आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर गैरव्यवहाराचा आरोप; विधानसभेत गदारोळ
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेसने प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिवारमधील एका प्रसंगावर बेतलेला व्हिडीओ तयार केला. यात मोदींना अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत आणि राहुल गांधी यांना शशी कपुर यांच्या भूमिकेत दाखवलं. तसेच यात मोदी माझ्याकडे ईडी, पोलीस, सत्ता, पैसा, मित्र असल्याचं सांगत आहेत. त्यावर राहुल गांधी संपूर्ण देश माझ्याबरोबर आहे, असं बोलताना दिसत आहे. या व्हिडीओत भारताचा नकासाही दाखवण्यात आला आहे. याच नकाशावर शर्मा यांनी आक्षेप घेतला.