आसाम युवक काँग्रेसच्या अध्यक्ष अंकिता दत्ता यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. आणि सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले. तसेच पक्षाकडून चौकशीही होत नसल्याचं म्हटलं. यानंतर काँग्रेसने पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत अंकिता दत्ता यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं. यावर आता भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री हेमंत शर्मा म्हणाले, “आसाममधील हा प्रकार लक्षात आल्यावर आम्ही काँग्रेसला सांगितलं होतं की, हा तुमचा पक्षांतर्गतचा विषय आहे. त्यावर उपाययोजना करा. एका मुलीच्या सन्मानाचा प्रश्न आहे. अशावेळी कुणीही असो, कारवाई व्हायला हवी. मात्र, कारवाई करण्याऐवजी काँग्रेसने पीडित मुलीलाच पक्षातून निलंबित केल्याचं मला आत्ताच समजलं.”
व्हिडीओ पाहा :
“काँग्रेस पक्षाने हा विषय सोडवला नाही. त्यामुळे आता कायदा त्याचं काम करेल आणि कारवाई होईल. मी काँग्रेसला सांगितलं होतं की, तुमच्याच युवक काँग्रेसच्या आसाम अध्यक्षाचं प्रकरण आहे. त्यांनी हा प्रश्न सोडवावा. त्यामुळे पोलिसांना यात कारवाई करण्याची वेळ येणार नाही. मात्र, काँग्रेसने हा प्रश्न सोडवला नाही. तसेच हा प्रश्न आणखी मोठा केला. त्यामुळे आता कायद्याला आपलं काम करावं लागेल,” असा इशारा शर्मा यांनी दिला.
नेमकं प्रकरण काय?
काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आलेली नाही, असंही त्यांनी नमूद केलं होतं.
अंकिता दत्ता म्हणाल्या होत्या, “मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. आणि सचिव वर्धन यादव माझा छळ करत आहेत. वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही. ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत. मी याबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, अद्यापही यावर चौकशी समिती नेमण्यात आली नाही.”
“तू वोडका पिते का?”
“रायपुरमधील अधिवेशनादरम्यान मी सभामंडपात प्रवेश करत असताना श्रीनिवास व्ही. बी. समोरून येत होते. ते मला म्हणाले की, तू काय पिऊन मेसेज करते. तू वोडका पिते का? युवक काँग्रेसचे अध्यक्ष एका राज्याच्या महिला अध्यक्षाबरोबर असं बोलताना पाहून मला धक्का बसला. धक्का बसल्याने मी शांत राहिले. त्यानंतर मी श्रीनिवास यांनी अशाप्रकारे वर्तन केल्याची तक्रार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे, सरचिटणीसांकडे केली. हे अगदीच सहन केलं जाऊ शकत नाही,” असं अंकिता दत्ता यांनी म्हटलं होतं.