गेल्या दोन दिवसांपासून देशभर कर्नाटक निवडणूक निकालांची चर्चा आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपाची मोठी पीछेहाट झाल्यानंतर यासंदर्भात तर्क-विर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी काँग्रेसवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तेलंगणाच्या करीमनगरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं. तसेच, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही हल्लाबोल केला.
काँग्रेसवर टीकास्र
“सचिन तेंडुलकरनं सातत्याने द्विशतक झळकावलं आहे. पण कधीकधी तोही शून्यावर बाद होतो. काँग्रेसनं फक्त एक राज्य जिंकलं आहे. पण तरी ते किती आरडाओरड करत आहेत. आम्ही अनेक राज्यांमध्ये जिंकलो आहोत. पण आम्ही कधीच त्यावर इतकी आरडाओरड केली नाही”, असं हिमंता बिस्व सरमा म्हणाले.
जनता दलाच्या पिछेहाटीबरोबरच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू
‘मी आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले”
आसाममध्ये आपण एका दिवसांत ६०० मदरसे बंद केल्याचं सांगत हिमंता बिस्व सरमा यांनी असदुद्दीन ओवैसींना आव्हान दिलं. “मी आसाममध्ये लव्ह जिहादविरोधात काम करत आहे. आसाममध्ये मी मदरसा शिक्षण व्यवस्था बंद करण्याचं काम करत आहे. मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा आम्ही एकाच दिवशी ६०० मदरसे बंद केले. ओवैसी म्हणाले की तुम्ही मदरसे बंद केले, मी तुम्हाला बघून घेईन. मी त्यांना म्हणालो, तुम्ही काय बघून घ्याल? तुम्ही मला तुमच्या घरी बोलवा. मी तुमच्या घरी स्वत: येईन. मग जेवढं मला बघायचंय, तेवढं बघून घ्या”, असं हिमंता बिस्व सरमा म्हणाले.
“फक्त मलाच नाही, या नव्या भारतालाही बघून घ्या जो ओवैसींना, रझाकारांना घाबरत नाही. मी ओवैसींना सांगू इच्छितो की ६०० मदरसे मी २ वर्षांत बंद केले. अजून ३०० मदरसे मी या वर्षी बंद करणार आहे”, असं आव्हान त्यांनी ओवैसींना दिलं आहे.