केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं ज्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. आमची सत्ता आली तर आम्ही मध्य प्रदेशातल्या सगळ्यांना मोफत रामलल्लाचं दर्शन घडवू असं अमित शाह म्हणाले होते. ज्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली होती. अमित शाह रामाचे एजंट आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. तर भाजपाने आता बहुदा ट्रॅव्हल खातं सुरु केलं असावं अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली होती. यावरुन झालेली टीका शमते न शमते तोच आणखी एका भाजपा नेत्याने असंच वक्तव्य केलं आहे.
आसामचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले की जर तेलंगणात भाजपाचं सरकार आलं तर आम्ही सगळ्यांना रामाचं दर्शन घडवू. आम्हाला कुठलाही फायदा नको आहे. आम्ही सगळ्यांना राम मंदिराचं दर्शन घडवू असं हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल होतं आहे.
१४ नोव्हेंबरला काय म्हणाले होते अमित शाह?
अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आणि मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन मतदारांना दिले. मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शहा बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल. अशात हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.
हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावर अनेक लोक कमेंट करत आहेत. मोफत राम मंदिर दर्शन म्हणजे तुम्ही दर्शन घेण्यासाठी पैसे लावणार हे उघड आहे असं एका युजरने म्हटलं आहे. तुम्ही निवडणूक कशाला लढता त्यापेक्षा ट्र्रॅव्हल्स कंपनी उघडा असं म्हणत आणखी एका युजरने सुनावलं आहे. वाह काय मस्त लॉलीपॉप देता असंही एका युजरने म्हटलं आहे. हिमंता बिस्वा सरमा यांचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं असून लोक उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत.