पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे देशातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षीही मोदींनाच पंतप्रधान करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत ‘INDIA’ या नावाने नवी आघाडी उभी केली आहे. मंगळवारी एकीकडे दिल्लीत एनडीएच्या ३९ पक्षांची बैठक झाली तर बंगळुरूत २६ विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असताना आता भाजपाकडून चक्क ‘इंडिया’ या नावावरच आक्षेप घेण्यात आला आहे.
विरोधकांची ‘INDIA’ नावाखाली आघाडी!
बंगळुरूत भाजपाविरोधी पक्षांच्या आघाडीला INDIA अर्थात Indian National Democratic Inclusive Alliance असं नाव देण्यात आलं आहे. या नावाखाली बहुतेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल अशी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. विरोधकांच्या आघाडीतून थेट मोदींना आव्हान देण्यात आलेलं असताना दुसरीकडे ही आघाडी फार काळ एकत्र राहू शकणार नाही, असा दावा भाजपाकडून केला जात आहे.
एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे भाजपाचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी थेट ‘इंडिया’ या नावालाच आक्षेप घेतला आहे. हे नावच मुळी वसाहतवादाचं देणं असून अपण कोणत्याही प्रकारच्या वसाहतवादी वारशाला नाकारलं पाहिजे, असंही हिमंता बिस्व सर्मा म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता इंडियाऐवजी ‘भारत’नावाचा पुरस्कार करायला सुरुवात केली आहे!
देशामध्ये ५४३ खासदार, मग संसदेमध्ये ‘४२०’ क्रमांकाचे आसन का नसते ?
हिमंता बिस्व सर्मांचं ट्वीट व्हायरल!
“आपल्या देशातील सभ्यतांमध्ये आजपर्यंत झालेला लढा हा भारत व इंडिया याभोवतीचा आहे. ब्रिटिशांनी आपल्या देशाला इंडिया हे नाव दिलं. अशा वसाहतवादी गोष्टींपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला हवा. आपले पूर्वज ‘भारत’साठी लढले आणि आपणही भारतासाठीच काम करत राहू”, असं ट्वीट हिमंता बिस्व सर्मा यांनी केलं आहे.
त्यामुळे आता ‘इंडिया’ या नावालाही भाजपाचा विरोध आहे का? असा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला आहे.