आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राम मंदिरावरून मोठं वक्तव्यं केलं आहे. सरमा म्हणाले की, आम्ही जनतेला जे वचन दिलेलं ते पूर्ण केलं आणि बाबरचं अतिक्रमण हटवून राम मंदिर बांधलं आहे. राम मंदिर बांधण्याचा जो संकल्प आम्ही केला होता तो आता पूर्ण होत आहे. काही लोकांना असं वाटत होतं की, राम मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला तर देशात जातीय वाद निर्माण होईल. परंतु असं झालं नाही. त्याउलट हिंदू आणि मुस्लीम लोकांमधला जिव्हाळा वाढला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा सध्या त्रिपुरामध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. येथील एका प्रचारसभेत ते बोलत होते. सरमा म्हणाले की, आम्ही संकल्प केला होता की, आमचं सरकार आल्यावर आम्ही राम मंदिर बांधू. काही लोकांना त्यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला तर देशात हिंदू आणि मुस्लीम लोकांमध्ये जातीय तणाव निर्माण होईल. परंतु तुम्ही एकदा मोदीजींकडे पाहा. एकीकडे राम मंदिर बांधलं जात आहे. तर दुसरी कडे हिंदू आणि मुस्लिमांमधला बंधूभाव वाढला आहे. रामाच्या जन्मभूमीवर बाबरने अतिक्रमण केलं होतं. आता आम्ही बाबरला तिथून हटवलं आहे. अयोध्येत आता भव्य राम मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे.
मंदिराचं काम ५० टक्के पूर्ण
अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराचं काम ५० टक्के पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी. श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितलं होतं की, मंदिराचं ५० टक्के काम पूर्ण झालं आहे. जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी उघडलं जाईल. मंदिरात लवकरच श्रीराम आणि अन्य देवी-देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा केली जाईल. मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरू आहे.
हे ही वाचा >> भाजपाने त्रिपुरा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, जेपी नड्डा, स्मृती इराणींसह स्टार प्रचारकांच्या ३६ सभा होणार
१,८०० कोटींचा खर्च
मंदिराच्या निर्मितीसाठी १८०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. याच परिसरात वाल्मिकी, शबरी, जटायू, सीता, गणपती आणि लक्ष्मणाचं मंदिर देखील बांधलं जाईल. या मंदिरांसाठी राम मंदिराच्या आसपास ७० एकर जमीन निवडली आहे.