काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ गुरूवारी आसाममध्ये पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी आसामच्या भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. देशातील सगळ्यात भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आसाममध्ये आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. याला मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे राहुल गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर द्वेष आणि जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला आहे.
“देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आसाममध्ये आहे. इथे काय चालले आहे, हे जनतेला माहिती आहे. न्याय यात्रेदरम्यान आम्ही आसामचे प्रश्न प्राधान्याने मांडू,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
“मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे कुटुंब भ्रष्टाचारात गुंतलं आहे. मुख्यमंत्र्यांना वाटते पैशानं जनतेला विकत घेता येतं. पण, आसामी जनतेला विकत घेता येणार नाही. आदिवासी आणि चहा कामगारांवर भाजपा सरकारकडून खूप अन्यायकेला जातोय,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधींनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ते भ्रष्टच नाही, तर डुप्लिकेट आहेत. त्यांच्या कुटुंबाचे नाव गांधी नाही,” असं टीकास्र हिंमत बिस्व सरमा यांनी डागलं आहे.