गुवाहटी : कर्करोगाने पत्नीचे रुग्णालयात निधन झाल्याच्या काही मिनिटानंतर भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:वर पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी आसाममध्ये घडली. शिलादित्य चेतिया (४४) असे अधिकाऱ्याचे नाव असून, ते आसाम सरकारमध्ये गृह आणि राजकीय सचिव होते.

आजारी पत्नी अगोमोनी बारबरुआ यांच्या उपचारासाठी शिलादित्य गेल्या चार महिन्यांपासून रजेवर होते. अगोमोनी गुवाहटीमधील खासगी रुग्णालयात दोन महिन्यांपासून उपचार घेत होत्या. मंगळवारी दुपारी डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केल्याच्या काही मिनिटांतच शिलादित्य यांनी पत्नी उपचार घेत असलेल्या अतिदक्षता विभागात गोळी झाडून आत्महत्या केली. आसामचे पोलीस महासंचालक जी.पी. सिंग यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>Bihar Bridge Collapse : १२ कोटींचा पूल बांधला, उद्घाटनाआधीच कोसळला; व्हिडीओ व्हायरल

शिलादित्य यापूर्वी गोलाघाट, तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक होते. सध्याच्या पोस्टिंगपूर्वी त्यांनी चौथ्या आसाम पोलीस बटालियनचे कमांडंट जबाबदारी पार पाडली होती. त्यांचे वडील प्रमोद चेतिया हे देखील ‘डीआयजी’ दर्जाचे पोलीस अधिकारी होते. शिलादित्य यांना कोणतेही अपत्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.