काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. बी. व युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही यावर अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आलेली नाही, असंही त्यांनी नमूद केली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्या बुधवारी (१९ एप्रिल) एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता दत्ता म्हणाल्या, “मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. आणि सचिव वर्धन यादव माझा छळ करत आहेत. वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही. ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत. मी याबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडे याबाबत तक्रार केली. मात्र, अद्यापही यावर चौकशी समिती नेमण्यात आली नाही.”

“तू वोडका पिते का?”

“रायपुरमधील अधिवेशनादरम्यान मी सभामंडपात प्रवेश करत असताना श्रीनिवास व्ही. बी. समोरून येत होते. ते मला म्हणाले की, तू काय पिऊन मेसेज करते. तू वोडका पिते का? युवक काँग्रेसचे अध्यक्ष एका राज्याच्या महिला अध्यक्षाबरोबर असं बोलताना पाहून मला धक्का बसला. धक्का बसल्याने मी शांत राहिले. त्यानंतर मी श्रीनिवास यांनी अशाप्रकारे वर्तन केल्याची तक्रार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे, सरचिटणीसांकडे केली. हे अगदीच सहन केलं जाऊ शकत नाही,” असं मत अंकिता दत्ता यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : सचिन पायलट अशोक गेहलोत सरकरविरोधात पुन्हा आक्रमक, म्हणाले “उपोषणाला आठवडा झाला, पण…”

“अद्यापही चौकशी समिती नेमलेली नाही”

अंकिता दत्ता पुढे म्हणाल्या, “श्रीनिवास आणि वर्धन यांच्याविरोधात अद्यापही चौकशी समिती नेमलेली नाही ही मुख्य अडचण आहे. हाच माझ्यासाठी काळजीचा मुद्दा आहे. मी वारंवार त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. आता सोशल मीडियावर ते माझे पोस्टर्स तयार करत आहेत. वर्धन यादव यांनी माझा आणि आसाम मुख्यमंत्री हिमांतू शर्मा यांचा फोटो शेअर करत मी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. माझ्याकडे त्याचे स्क्रिनशॉटही आहेत.”

“माझे वडील मृत्यूशय्येवर असताना आसाम काँग्रेसचे अध्यक्ष होते”

“म्हणजे एखादी महिला तिच्या स्वसन्मानावर बोलत असेल, ती ज्या छळाला सामोरं जाते त्यावर बोलत असेल, तर पक्षाने अशाप्रकारे प्रतिक्रिया द्यायला हवी का? माझे वडील मृत्यूशय्येवर असताना आसाम काँग्रेसचे अध्यक्ष होते. माझे आजोबा, वडील आणि मी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला पक्ष सोडण्याची गरज नाही. त्यांना आम्हाला पक्षातून काढायचं असेल, तर त्यांनी काढावं. मात्र, आमचं काँग्रेस पक्षावर प्रेम आहे,” अशी भावना अंकिता दत्ता यांनी व्यक्त केली.

“महिलेबरोबर असं वर्तन करणारा युवक काँग्रेसचं नेतृत्व कसं करू शकतो?”

दत्ता म्हणाल्या, “श्रीनिवास आणि वर्धन यांच्यासारख्या लोकांनी पक्ष उद्ध्वस्त केला आहे. त्यांनी राज्यातील राजकारण उद्ध्वस्त केलं आहे. महिलेबरोबर अशाप्रकारचं वर्तन करणारा व्यक्ती युवक काँग्रेसचं नेतृत्व कसं करू शकतो? ते मला म्हणतात की, ही मुलगी बदनाम झाली आहे. ते माझ्याविरोधातील ईडी-सीबीआय प्रकरणं उकरत आहेत. ही प्रकरणं मागील वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली. मी एकटी या प्रकरणांविरोधात लढत आहे. मला जर भाजपातच जायचं असतं, तर ऑगस्ट त्यासाठी चांगली वेळ होती.”

“मी पक्षातील लिंगभेदभावाविरोधात तक्रार केल्याने पक्षाने असं वागावं का?”

“मला वडील नाहीत, मला पती नाही, मी माझी आई आणि तीन बहिणींबरोबर या प्रकरणांचा सामना करत आहे. आम्ही चुकीचे नाहीत त्यामुळेच आम्ही याच्या विरोधात लढत आहोत. मात्र, मी पक्षातील लिंगभेदभावाविरोधात तक्रार केल्याने पक्षाने असं वागावं का?” असा प्रश्न अंकिता दत्ता यांनी विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam iyc president ankita dutta serious allegation of harassment on srinivas v b pbs