आसाममधील पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जमीन करार करून देण्याच्या मागणीसाठी शेतक ऱ्यांच्या संघटनेतील एका सदस्याने आत्मदहन केले. तो शंभर टक्के भाजला असून त्याचे प्राण वाचण्याची शक्यता कमी आहे.  
आसाममध्ये अशा प्रकारची घटना प्रथमच घडली असून त्यानंतर रस्ते रेल्वे वाहतूक रोखण्यात आली. आत्मदहन करणाऱ्या इसमाचे नाव प्रणव बोरो असे असून त्याने कृषक मुक्ती संग्राम समिती या संघटनेने आयोजित केलेल्या आंदोलना वेळी सचिवालयासमोर  पेट्रोल टाकून पेटवून घेतले.
बोरो याला गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून तो १०० टक्के भाजला असल्याचे रुग्णालय अधीक्षक डॉ.रामेन तालुकदार यांनी सांगितले. बोरो याने पेटवून घेतल्याचे वृत्त समजताच राज्यात अनेक ठिकाणी रेल रोको व रास्ता रोको करण्यात आले. अतिरिक्त पोलिस महासंचालक  ए.पी.राऊत यांनी सांगितले, की गोलघाट, शिबसागर येथे रास्ता रोको तर जोरहाट येथे रेल रोको करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ वर अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. त्यात जोरहाट जिल्ह्य़ातील कोलियापानीचा समावेश आहे. शिवसागर जिल्ह्य़ात गौरीसागर येथेही १० निदर्शकांना अटक करण्यात आली. गुवाहाटी, गोलघाट, जोरहाट येथे संघटनेच्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मोरीगाव व सोनितपूर जिल्ह्य़ातही रेल्वेमार्ग अडवण्यात आले. जोरहाट, तिनसुकिया, शिबसागर जिल्ह्य़ात अनेक लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून घोषणा देत होते.

Story img Loader