अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले. यावरून सोमवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या कछरच्या पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असलेले वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली असून, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.
संबंधित वृत्त- आसाम-मिझोराम सीमासंघर्षांत सहा पोलीस ठार, ५० जखमी
हा भाग वादग्रस्त असल्याचे दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांनी यापूर्वी मान्य केले आहे. त्यांच्यातील या कराराचे उल्लंघन आसाम पोलिसांनी केल्याने हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येते. दोन्ही पोलीस दलांतील ही धुमश्चक्री सुमारे सहा तासांहून अधिक काळ सुरू होती. यात पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात आसाम पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ५० पोलीस जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आसाममधील कछर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर यांचाही समावेश आहे. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. निंबाळकर हे मूळच महाराष्ट्रातील बारामतीचे रहिवाशी आहेत. ते आसाम केडरचे अधिकारी आहेत.
Visited Silchar Medical College and Hospital to meet injured police officials & directed doctors to ensure best treatment to them. Asked to send seriously injured personnel for higher-level treatment by air ambulance on priority: Assam CM Himanta Biswa Sarma pic.twitter.com/GcbWr0JncZ
— ANI (@ANI) July 27, 2021
या संघर्षात मृत्यू झालेल्या पोलिसांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्याच्या संवैधानिक सीमेचं संरक्षण करताना राज्य पोलीस दलाचे सहा जवान शहीद झाले आहेत. मिझोराम पोलिसांनी लाईट मशिन गन वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री शर्मा यांनी केला आहे. तर मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी संघर्षावरून आसाम पोलिसांवर आरोप केला आहे. “पूर्वेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर मी त्या परिसरातून गेलो होतो. सगळं काही व्यवस्थित होतं. सोमवारी सकाळी आसामचे आयजीपी आणि २०० पोलीस मिझोरामच्या दिशेनं आले आणि अचानक परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंने गोळीबार सुरू झाला. यात काही जणांचा मृत्यू झाला”, असं झोरमथांगा यांनी म्हटलं आहे.