आसाम राज्याच्या १५ जिल्ह्य़ांत  फैलावलेल्या तब्बल ८० हजार हेक्टर भूखंड आजूबाजूच्या सहा राज्यांनी बळकावल्याची माहिती राज्य सरकारतर्फे गुरुवारी विधानसभेत देण्यात आली.
नागालँड, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांनी आसामच्या भूमीवर अतिक्रमण केल्याची माहिती सीमा भाग विकास राज्यमंत्री सिद्दिकी अहमद यांनी सभागृहाला दिली.
 नागालँडने आसामच्या सर्वाधिक म्हणजे ५९,१५९.७७ हेक्टर भूखंडावर कब्जा केला आहे, तर त्रिपुराने २५ हेक्टर जमीन काबीज केल्याचे अहमद यांनी सांगितले. याशिवाय अरुणाचल प्रदेशने १३ हजार २११.०५ हेक्टर, तर मेघालय, मिझोरम आणि पश्चिम बंगाल यांनी अनुक्रमे तीन हजार १८३.६४ हेक्टर, एक हजार ९८६ हेक्टर आणि २६४ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण केल्याचे अहमद यांनी सांगितले.
या अतिक्रमणामुळे आसामचे तिनसुकिया, धेमाजी, गोलपारा, जोऱ्हाट, सोनितपुर, काचर, शिवसागर, कार्बी अंगलोंग, कामरुप ग्रामीण, कामरुप शहर, लखिमपूर, गोलाघाट, हैलाकंडी, करिमगंज आणि कोक्राझार हे जिल्हे प्रभावित झाल्याची माहिती अहमद यांनी दिली.
सीमावाद ही मोठी आणि जुनी समस्या आहे. या प्रकरणी आम्ही अरुणाचल प्रदेश आणि नागालँडविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहे. नागालँडने केलेल्या अतिक्रमणाबाबतचा खटला अंतिम टप्प्यात असून येत्या एप्रिलपर्यंत त्याबाबत निर्णय येण्याची शक्यता असल्याचेही अहमद यांनी सांगितले.

Story img Loader