आसाम पोलिसांनी काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना दिल्ली न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यानंतर आसामला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तत्पूर्वी पवन खेरा हे पक्षाच्या अन्य सहकाऱ्यांसमवेत काँग्रेस अधिवेशनासाठी दिल्लीहून रायपूरला निघालेले असताना, त्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवलं होतं.
या प्रकारामुळे काँग्रेसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी दिल्ली विमानतळावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. तर आता आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर पवन खेरा यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ आता पाहूयात. ही मोठी लढाई आहे लढण्यासाठी तयार आहोत. बघूयात काय कारवाई केली जाते. सर्व माहिती मिळाल्यानंतर तुम्हालाही सांगू.”
पवन खेरा यांना अटक केल्यानंतर आसाम पोलीस विभागाचे आयजीपी प्रशांतकुमार भुईया यांनी सांगितले की, आम्ही दिल्ली पोलिसांना त्यांना अटक करण्याची विनंती केली होती. स्थानिक न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर आम्ही त्यांना आसामला नेणार आहोत.
हेही वाचा – काँग्रेस अधिवेशनासाठी रायपूरला निघालेल्या पवन खेरा यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवलं!
या अगोदर प्रशांत कुमार भुईया यांनी सांगितले होते की, आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यातील हाफलोंग पोलीस स्टेशनमध्ये पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी आसाम पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.