Assam Rape Case : ट्युशन क्लासमधून घरी परतणाऱ्या एका शाळकरी मुलीवर आसामध्ये बलात्कार झाल्यानंतर देश पुन्हा एकदा हादरला. ही मुलगी तिच्या आजी-आजोबांकडे राहत असून वडील कामानिमित्त गुवाहाटी येथे राहतात. तर आईचं लहानपणीच निधन झालं आहे. या घटनेनंतर तिचे वडील तिला भेटले तेव्हा तेही तिची अवस्था पाहून हादरले होते. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पीडित मुलीचे वडील गुरुवारी रात्री गुवाहाटीहून परत आले. ते म्हणाले, “मी जेव्हा तिला भेटले तेव्हा ती बोलूही शकत नव्हती. आमच्या गावात सगळेच घाबरले आहेत. इतर दोन आरोपींना पकडून शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. नाहीतर लोक आपल्या मुलींच्या बाबतीतही असं काही घडू शकतील या भीतीने जगत राहतील.”
आरोपीचे घर पीडित मुलीच्या शेजारील गावात असून, शनिवारी तेथे विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे ३० कर्मचाऱ्यांच्या स्टेशनच्या फोर्समध्ये ५० पोलिस कमांडो, आणखी ३५ पोलिस कर्मचारी आणि २० सीआरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, तणाव वाढण्याच्या अपेक्षेने जिल्ह्याला सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.
शिकवणी वर्गाला रोज काका सोडायला जायचे, पण…
ती जिथे सापडली तो भाग तिच्या गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याने भातशेतीने वेढलेला आहे. तेथे दिवे नाहीत. तिच्या आजीने सांगितले की, “शुक्रवारी मुलगी ६ किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या गावात शिकवणी वर्गातून परतली नाही तेव्हा मला काळजी वाटली. ती आठवड्यातून तीनदा दुपारी तिथे शिकवणीसाठी जाते आणि सहसा तिला तिचे काका सोडायला यायचे. पण त्या दिवशी ती सायकलने क्लासला गेली होती. ती संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घरी परतली नसल्याने मी तिच्या मैत्रिणीला फोन केला. पण ती म्हणाली की ती काही वेळापूर्वीच निघाली आहे. मुलीशी संपर्क साधण्याकरता तिच्याकडे मोबाईल फोनही नव्हता.
इंग्रजी शाळेत शिकणारी ती गावातील एकमेव मुलगी आहे
तिच्या एका चुलत बहिणीने सांगितले की, “ती दुसऱ्या गावात शिकायला जाते कारण ती इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आमच्या गावातली ती एकमेव मुलगी आहे जी तिथे जाते. इतर येथील राज्य सरकारच्या शाळेत शिकतात. तिला चांगलं शिक्षण मिळावं आणि आयुष्यात चांगलं काम करता यावं म्हणून आम्ही तिला त्या शाळेत टाकलं. पण आता ती पुन्हा त्या शाळेत जाईल का? याबाबत आम्हाला शंका आहे.”
आरोपीच्या घरावर बहिष्कार
या प्रकरणात तीन आरोपी असून एका आरोपीला अटक केली होती. परंतु, त्याला घटनास्थळी घेऊन जात असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने तलावाड उडी मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. “आम्ही शनिवारी एक बैठक घेतली आणि एकत्रितपणे ठरवले की आम्ही त्याचा मृतदेह आमच्या गावातील स्मशानभूमीत पुरू देणार नाही. त्यांच्या घरांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. आम्ही नेहमीच वेगवेगळ्या समुदायातील लोकांसोबत एकत्र राहिलो आणि आम्ही असेच जगत राहावे यासाठी आम्ही हा ठाम निर्णय घेतला आहे”, असे आरोपीच्या गावातील रहिवासी सकलिन मुस्ताक अहमद यांनी सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd