बोडो फुटीरतावाद्यांकडून ७० आदिवासींची हत्या करण्यात आलेल्या भागात तैनात केलेल्या सैन्याची लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी शनिवारी पाहणी केली. याच वेळी या भागात अतिरिक्त फौजा तैनात करण्यात येतील का, याची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. 

राज्यातील सुरक्षा स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी घेण्यात आलेले उपाय आणि कारवाईची माहिती त्यांनी शनिवारी सकाळी अधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली.
राज्यात समाजविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्यांविरुद्ध कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश सुहाग यांनी फिल्ड कमांडरना दिले. कारवायांसाठी अतिरिक्त फौज लागल्यास ती पुरवण्याची हमी त्यांनी दिली. या वेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवण्यात जवानांनी कोणतीही कसूर ठेवू नये, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
समाजात दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध निष्ठूर कारवाई करा, असा आदेशही त्यांनी या वेळी दिला. राज्यातील फुटीरतावादी संघटनांवर दबाव आणण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून सावधगिरीचे उपाय हाती घेण्याचे सुहाग यांनी आदेशात म्हटले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी फिल्ड कमांडर यांनी हाती घेतलेल्या विविध उपायांबाबतही सुहाग यांनी समाधान व्यक्त केले.

Story img Loader