माझा मुलगा दहशतवादी संघटनेत सामील झाला असेल तर सरकारने त्याला गोळ्या घातल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया आसाममधील कमर-उर- जमान या तरुणाच्या आईने दिली आहे. कमर- उर- जमान हा हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची शक्यता आहे.

आसाममधील जमुनामूख येथे राहणाऱ्या कमर- उज- जमान हा तरुण हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कमरच्या हातात बंदुक घेतलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये कमर हिज्बुलचा दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. आसाममधील पोलिसांनी या फोटोची दखल घेतली आहे. ‘कमर दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे का याचा तपास सुरु आहे. आम्ही यासंदर्भात जम्मू- काश्मीर पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यांच्या मदतीने चौकशी सुरु आहे’ अशी प्रतिक्रिया आसाम पोलिसांच्या विशेष शाखेचे महासंचालक मुकेश सहाय यांनी दिली.

कमरच्या आईनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘फोटोमधील मुलगा कमरच आहे. जर तो खरंच दहशतवादी संघटनेत सामील झाला असेल तर सरकारने त्याला गोळ्या घातल्या पाहिजे. तो देशाचा शत्रू आहे. आम्हाला मुलाचा मृतदेहदेखील नको. त्याचा मृतदेह प्राण्यांना खायला घातला पाहिजे. असा व्यक्ती जिवंत राहायला नको, असे त्याच्या आईने सांगितले.

कमरची आई तेहरा बेगम यांना पाच मुलं आहेत. ‘१० महिन्यांपूर्वी कमर व्यवसायानिमित्त काश्मीरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला. यानंतर त्याने कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही’, असे तेहरा बेगम यांनी सांगितले.

कमर विवाहित असून त्याला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. कमरच्या भावाने देखील यावर प्रतिक्रिया दिली. ‘तो माझा भाऊ नाही. तो देशद्रोही आहे. आम्ही त्याचा मृतदेह घरात देखील आणणार नाही’, असे मुफीदूलने सांगितले. कमर हा दहावीपर्यंत शिकल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. गेल्या वर्षी कमरच्या कुटुंबीयांनी जम्मू- काश्मीर पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल केली होती, असे समजते. कमर दहशतवाद्यांच्या संपर्कात कसा आला, याचा देखील तपास सुरु आहे.

Story img Loader