क्रिकेटपटू इमरान खान याच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या संस्थापक सदस्य असलेल्या झहरा शाहीद हुसेन यांची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या भागात नॅशनल असेंब्लीच्या जागेसाठी काही भागात फेरमतदान सुरू होण्यापूर्वी हा प्रकार घडला.
झहरा हुसेन (६०) या  पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या सिंध शाखेच्या उपाध्यक्षा होत्या.  झहरा या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या सदस्यही होत्या. त्यांच्या हत्येमागचा हेतू स्पष्ट झालेला नाही. हल्लेखोर मोटरसायकलवरून पळून गेले. निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळच झहरा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना लक्ष्य करण्यासाठीच हल्लेखोर आले होते. नॅशनल असेंब्ली मतदारसंघ एनए २५० मध्ये ४३ मतदान केंद्रांवर फेरमतदान होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांची हत्या करण्यात आली आहे.
इमरान खानने रूग्णालयातून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पाकिस्तान तेहरीक ए इन्साफच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणारे अल्ताफ हुसेन हेच या हत्येस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader