Odisha Raj Bhavan : सत्तेचा गैरवापर करण्याचे अनेक प्रकार सध्या एकामागोमाग समोर येत आहेत. महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे गाडी, घर, स्वतंत्र केबिन मागितल्याचे प्रकरण ताजे असताना ओडिशामध्येही असेच एक प्रकरण घडले आहे. ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांच्या मुलाला रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी आलिशान गाडी पाठविली नाही म्हणून मुलाने राज भवनमधील अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या अधिकाऱ्याने संबंधित प्रकरण वरिष्ठांपर्यंत आणि पोलीस स्थानकात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला दाद मिळाली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैकुंठ प्रधान (४७) असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ओडिशा राज भवन सचिवालयातील घरगुती विभागात सहायक विभाग अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ७ जुलैच्या रात्री राज्यपालांचा मुलगा ललित कुमार आणि त्याच्यासह पाचजणांनी मिळून पूरी शहरातील राज भवनातच मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप वैकुंठ प्रधान यांनी केला आहे. पुरी येथील राज भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन होणार होते, त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रधान यांची नियुक्ती झाली होती.

हे वाचा >> Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

मारहाण झाल्यानंतर १० जुलै रोजी प्रधान यांनी राज्यपालांचे प्रधान सचिवांना लेखी तक्रार दिली. राज भवनाचे अधिकारी आणि प्रधान सचिव शाश्वत मिश्रा यांच्याशी द इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींनी सदर प्रकरणासंबंधी प्रतिक्रिया मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही.

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी पुरी येथे प्रतिनियुक्ती

प्रधान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, माझी मूळ पोस्टिंग भुवनेश्वर येथील राजभवनात आहे. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूरी येथील राजभवनात येत असल्यामळे सर्व व्यवस्था पाहण्यासाठी ५ जुलैपासून माझी तिथे नियुक्ती करण्यात आली होती. ७ आणि ८ जुलै रोजी राष्ट्रपतींचा दौरा संपन्न झाला. ७ जुलैच्या रात्री ११.४५ मिनिटांनी मी माझ्या कार्यालयात बसलो असताना राज्यपालांच्या आचाऱ्याने येऊन सांगितले की, ललित कुमारला मला भेटायचे आहे. त्यामुळे ललित कुमारकडे गेलो. तिथे जाताच ललित कुमार मला शिवीगाळ करू लागला. त्याची घाणेरडी भाषा सहन न झाल्याने मी त्यास विरोध केला. तर त्याने माझ्या कानशिलात लगावली.

प्रधान यांनी पुढे म्हटले, “ललित कुमारने मला मारल्यानंतर मी तात्काळ त्याच्या दालनातून पळालो आणि राजभवनमध्ये लपून बसलो. पण ललित कुमारच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी मला अडवले आणि फरपटत पुन्हा त्याच्या दालनात नेले. राजभवनचे कर्मचारी आणि ललित कुमारचे सुरक्षा रक्षक या घटनेचे साक्षीदार आहेत. तिथे नेल्यानंतर मला पुन्हा मारहाण करण्यात आली. सर्वांनी मिळून मला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तिथे जर माझा खून झाला असता तरी मला कुणीही वाचवले नसते.”

मारहाण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ जुलैला प्रधान सचिवांना तोंडी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर १० जुलै रोजी ईमेलद्वारे सर्व घटनाक्रम कथन केला. वैकुंठ प्रधान यांच्या पत्नी सयोज यांनी भुवनेश्वरच्या राजभवनाबाहेर या घटनेचा निषेध करत पोलिसांना दिलेल्या तक्रारीचे पत्र माध्यमांना दाखविले. त्या म्हणाल्या, आम्ही ११ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेलो. मात्र आमची तक्रार दाखल करून घेतली नाही. मग आम्ही ईमेलद्वारे आपली तक्रार पाठविली.

हे ही वाचा >> पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, सोन्याचे घड्याळ

माझे पती राज्यपालांच्या मुलाच्या सेवेसाठी नाहीत

सयोज यांनी सदर घटनाक्रमावर संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, माझे पती राजभवनात राज्यपालांना सेवा देण्यासाठी नियुक्त झालेले आहेत. त्यांच्या मुलाला सेवा देण्याचा प्रश्चच येत नाही. मारहाण झाल्यानंतर माझे पती पुरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही कानावर सदर प्रकार घातला. मात्र त्यांनी माझ्या पतीलाच उलट समज दिली. प्रधान यांनी २० वर्ष भारतीय हवाई दलात सेवा दिल्यानंतर २०१९ साली त्यांची राजभवनात नियुक्ती झाली होती, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assaulted by governor son lalit kumar for not sending luxury car to pick him up odisha raj bhavan staffer baikuntha pradhan claim kvg