ऑस्ट्रेलियात प्राणघातक हल्ला झालेल्या भारतीय विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या २० वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
या हल्ल्यानंतर तो कोमात गेला असला तरी उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे, त्याच्या भावाने सांगितले आहे. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यावर आठ जणांच्या टोळक्यावर भ्याड हल्ला केला होता. मनराजविंदर सिंग हा तरुण शिक्षणाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात आला होता. आपल्या भावाबरोबर तो राहात होता. मात्र आपल्याला मित्राबरोबर मेलबॉर्न शहर बघायचे आहे, असा हट्ट त्याने आपल्या भावाकडे धरला. आणि तो बाहेर पडला. येथील प्रिन्सेस पुलावर तो मित्रांबरोबर बसला असताना तेथे आठ जणांचे टोळके आले आणि त्यांनी मनराजविंदरवर हल्ला चढविला.
या टोळक्याने त्याच्या डोक्यावर लाथांनी प्रहार केले शिवाय त्याला काठीने मारहाण केली. यानंतर मनराजविंदर याच्या मित्राच्या तोंडावरही गुद्दे मारण्यात आले. मग त्या टोळक्याने या सर्वाचे मोबाइल घेऊन पोबारा केला.

Story img Loader