पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा बंगालच्या जनतेनं ममता बॅनर्जी यांच्यावरच विश्वास दाखवल्याचं दिसत आहे. तृणमूल काँग्रेसचंच सरकार पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं असताना आता त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसकडून या निकालांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. “जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते. जनतेने या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

मोदींच्या अतिमहत्त्वाकांक्षेला जनतेनं धूळ चारली!

“सत्तापिपासू वृत्तीने पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या मोदीजींच्या अतिमहत्त्वाकांक्षेला बंगालच्या जनतेनं धूळ चारली आणि या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले. जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यामुळे निवडणूक जरी पश्चिम बंगालमध्ये झाली असली, तरी त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत.

 

संजय राऊतांनीही साधला होता निशाणा!

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील पश्चिम बंगाल निवडणुकीविषयी बोलताना भाजपावर टीका केली होती. “भाजपानं केलेल्या व्यवस्थापनाचं कौतुक केलंच पाहिजे. त्यांनी प्रचंड मेहनत केली. देशभरातून लोकं आणली. देशाचे पंतप्रधान करोनाच्या संकटकाळात देखील तिथे तंबू ठोकून बसले. राज्याराज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नेऊन बसवले. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं इतकं सोपं नाही. भाजपाचे आकडे नक्कीच वाढत आहेत. लोकसभेतही वाढले आहेत. त्यांची मेहनतही आहे, गुंतवणूकही आहे, सगळंच आहे”, असं राऊत म्हणाले होते.

 

पश्चिम बंगाल निकालावर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवारांनीही दिल्या ममता दीदींनी शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्वीट करून ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “ममता बॅनर्जी, तुमच्या प्रचंड विजयाबद्दल तुमचं अभिनंदन. लोकांच्या कल्याणासाठीचं आणि करोनाच्या संकटाशी लढा देण्याचं आपलं काम असंच सुरू ठेऊयात”, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.