पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. मात्र, ‘विधानसभा निवडणुकांमधील हे निकाल भाजपासाठी इतकेही वाईट नव्हते, हे निकाल म्हणजे भाजपासाठी धक्का नाही उलट चांगले आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत भविष्यवाणी करणं कठीण आहे, मात्र मी अजुनही माझे पैसे मोदींच्या सत्तेत परतण्यावरच लावणार, असं दलाल स्ट्रीटचे ‘वॉरेन बफेट’ म्हटले जाणारे शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला म्हणालेत.

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असल्यामुळे भाजपाला तेथे सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागला. तरीही मोठं मताधिक्य मिळवण्यात पक्ष यशस्वी ठरला, जवळपास काँग्रेसऐवढीच मतांची टक्केवारी भाजपाची आहे. त्यामुळे हे निकाल भाजपासाठी इतकेही वाईट नव्हते उलट चांगले होते, असं ते म्हणाले.

इकनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, इंडिया इकोनॉमी कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना झुनझुनवाला म्हणाले की, भारत देश हा जबाबदार लोकशाही असलेला देश आहे. बाजार एखाद्या व्यक्तीवर किंवा पक्षावर अवलंबून नाहीये. पण मी एक भाजपाचा पाठिराखा आहे आणि राहिल. जर भाजप जिंकलं नाही तर काही आभाळ फाटणार नाहीये मात्र भाजपाने सत्तेत परतावं अशी बाजाराची इच्छा आहे.

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात शेअर बाजार नव्या उंचीवर पोहोचेल. भांडवल गुंतवणुकीचं पुनरुज्जीवन होत आहे. मोठ्या प्रमाणात स्थानिक पैसा बाजारात येण्याच्या तयारीत आहे. जीएसटीमुळे बाजाराला खूप फायदा झालाय. मात्र सगळे केवळ जीएसटीमुळे होणाऱ्या अडचणींबाबत बोलत आहेत, कोणीच जीएसटीच्या फायद्याबाबत बोलत नाही, असंही ते म्हणालेत.

Story img Loader