अखेर देशभरातील काँग्रेसविरोधी कौलावर शिक्कामोर्तब झाले. दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत मतदारांनी ‘कमळा’वर बोट ठेवून काँग्रेसचा दणदणीत पराभव केला. मध्य प्रदेशातील सत्ता भाजपने तिसऱ्यांदा आपल्याकडे राखली, तर दिल्ली अणि राजस्थानची सत्ता काँग्रेसकडून हिसकावून घेतली. छत्तीसगढने मात्र काँग्रेसची लाज काही प्रमाणात वाचविली. तेथे निसटत्या विजयावरच भाजपला समाधान मानून घ्यावे लागले. या निवडणुकीतील सर्वात लक्षणीय विजय आम आदमी पक्षाचा (आप) ठरला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने निर्माण झालेल्या हवेवर स्वार होत या पक्षाने दिल्लीत जागांची चांगलीच कमाई केली.  
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार राहुल गांधी असे या निवडणुकांचे चित्र रेखाटले गेले होते. या निवडणुकीत मतदारांनी राहुल गांधी यांना अस्मान दाखविले, मात्र दिल्ली आणि छत्तीसगढमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने मोदींचा रथही जमिनीवरच राहिला. भ्रष्टाचाराहून सुशासनाचा प्रश्नच मतदारांना महत्त्वाचा वाटतो हे अधोरेखित करणाऱ्या या निवडणूक निकालाने देशातील विद्यमान राजकीय समीकरणांतही मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संसदेसमोरील जातीय हिंसाचार, विमा, महिला आरक्षण अशा महत्त्वाच्या विधेयकांच्या भवितव्यावरही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिल्ली त्रिशंकू
दिल्लीकर मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला जोरदार दणका देतानाच कोणत्याही पक्षाला बहुमत न दिल्याने विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार आहे. मात्र ७० जागांच्या विधानसभेत ३१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेची संधी आहे. तरीही बहुमतासाठी भाजपला इतर पक्षांच्या कुबडय़ा वापराव्या लागणार आहेत. अकाली दल व राष्ट्रीय लोकदल यांचे भाजपला सहकार्य लाभण्याची शक्यता आहे.
निकाल अत्यंत निराशाजनक आहेत. या पराभवाची आम्ही गांभीर्याने मीमांसा करून झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. मात्र, या निकालांचा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. योग्य वेळीच काँग्रेस पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करेल.
सोनिया गांधी
काँग्रेसने चारही राज्यांत जिंकलेल्या जागांची गोळाबेरीज भाजपने एका राज्यात जिंकलेल्या एकंदर जागांएवढीही नाही. भाजपने ६६ टक्के जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेस २३ टक्क्य़ांपर्यंत आकुंचित पावली आहे. ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी आहे.
नरेंद्र मोदी

Story img Loader