वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची शेवटची ‘लढाई’ समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भारतीय जनता पक्षाचे बळ आणखी वाढवले तर, काँग्रेसला उत्तर भारतातून जवळपास हद्दपार केले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता निवडणुकीच्या प्रचारात ‘मोदी की गॅरेंटी है’ अशा शब्दांत साद घालणाऱ्या पंतप्रधानांना मतदारांनीही दाद दिली. मध्य प्रदेशमध्ये ‘मोदी हमी’सोबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ‘लाडली बहना’ योजना असा तिहेरी योग भाजपला दोन तृतियांश बहुमताकडे घेऊन गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव मतदारांवर असल्याचे या निकालांनी स्पष्ट झाले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तो कायम राहतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तेलंगणमधील सत्ताविजय हीच काय ती काँग्रेससाठी जमेची बाजू. देशात केवळ तीन राज्यांत सत्तेत उरलेल्या काँग्रेसला आता ‘इंडिया’ आघाडीतही जागावाटपासाठी तडजोड करावी लागेल, असे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगण ही तीन राज्ये काँग्रेसच्या हाती जातील आणि राजस्थान हे एकमेव भाजपकडे जाईल, अशी राजकीय विश्लेषकांची अटकळ होती. मात्र, प्रचाराचा ज्वर वाढू लागला तसे भाजपने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही प्रचाराची तीव्रता वाढवली. मोदी आणि अमित शहा यांच्या सभांचा धडाका, नियोजनबद्ध प्रचार आणि सरकारी योजनांची प्रसिद्धी यांच्या मदतीने भाजपने या दोन्ही राज्यांत विजयाची पार्श्वभूमी तयार केली. त्यामुळेच एकाचा अपवाद वगळता अन्य मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज काँग्रेसच्या बाजूने झुकले असताना प्रत्यक्षात मात्र, २३० पैकी १६३ जागांसह भाजपने दोन तृतियांश बहुमत मिळवले.

हेही वाचा >>>तेलंगणचा काँग्रेसला ‘हात’; बीआरएसची हॅट्ट्रिक हुकली

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे भूपेश बघेल पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे ठाम वाटणारे चित्रही भाजपच्या व्यूहरचनेने फिरवून टाकले. तेथे ९० पैकी ५६ जागा जिंकत भाजपने सत्ता काबिज केली. सरकारी योजना आणि घोषणांच्या जोरावर राजस्थानमध्ये सत्ताबदलाची परंपरा मोडू पाहणाऱ्या अशोक गेहलोत यांचे मनोरथ मतदारांनी मोडीत काढले. राजस्थानात ११५ जागा जिंकून भाजपने उत्तरेतील काँग्रेसचे मोठे राज्य ताब्यात घेतले.एकामागून एक पराभवांचे आकडे डोळय़ांवर आदळत असताना, तेलंगणमधील विजय काँग्रेसला किंचित दिलासा देऊन गेला. के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला मागे टाकून काँग्रेसने ६४ जागांसह हे राज्य जिंकले. काँग्रेसला हात देणारे कर्नाटकनंतरचे दक्षिणेतील हे दुसरे राज्य. या निकालांनंतर काँग्रेस आता हिमाचल प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या तीन राज्यांतच एकहाती सत्तेत उरला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बळ वाढवण्यासाठी काँग्रेसला ‘इंडिया’ आघाडीसाठी जोर लावावा लागेल. त्याचवेळी या आघाडीत अधिकारवाणी टिकवून ठेवताना काँग्रेसचा कस लागेल, हेदेखील स्पष्ट आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली. हा ‘तात्पुरता धक्का’ असून ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या साथीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तेलंगणमध्ये निर्णायक कौल दिल्याबद्दल मी तेथील जनतेने आभार मानतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानात आम्हाला मते देणाऱ्यांनाही धन्यवाद. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election results of four states bjp wins amy
Show comments