नवी दिल्ली, मुंबई: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसची कसोटी आहे. राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेस यांच्यात चुरस आहे . तेलंगणात के.चंद्रशेखर राव तिसऱ्यांदा विजय मिळवणार का याचीही उत्सुकता आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते.
सध्या काँग्रेस दोन राज्यांमध्ये सत्तेत असून, भाजप, भारत राष्ट्र समिती आणि मिझोरम नॅशनल फ्रंट हे प्रत्येकी एका राज्यात सत्ताधारी पक्ष आहेत. राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल होण्याची परंपरा कायम राहते की केरळ आणि तमिळनाडूप्रमाणे ही परंपरा खंडित होते ? मिझोरममध्ये प्रथमच झोरम पीपल्स मूव्हमेंट या पक्षाने सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला आव्हान दिले आहे. पाच वर्षांपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तिन्ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती. पण सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशात फक्त एक तर छत्तीसगडमध्ये दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा लोकसभेवर परिणाम होत नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> केसीआर दोन जागांवर निवडणूक लढवणार, पण नेमकं कारण काय?
भाजपने कोणत्याच राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पाच वर्षांचा हिशेब मागणाऱ्या राजस्थानच्या मतदारांसमोर काँग्रेसला पुन्हा संधी द्यायची की, परंपरेप्रमाणे विरोधकांना सत्तेत आणायचे हा मोठा पेच उभा राहिला आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद दूर करण्यात केंद्रीय नेतृत्वाला यश आले आहे. प्रदेश भाजपमधील नेतृत्वावरून सुरू असलेली अंतर्गत रस्सीखेच तीव्र झाली आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक अटीतटीची होण्याची आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस की भाजप ?
छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर काँग्रेसची सारी भिस्त आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे टाळले आहे. माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना पक्षाने तेवढे महत्त्व दिलेले नाही. पाच वर्षांतील विकासकामांवर काँग्रेसची सारी भिस्त आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असे निवडणुकीपूर्वीचे सारे सर्वेक्षणाचे अंदाज आहेत.
तेलंगणात चंद्रशेखर राव हॅट्ट्रिक करणार का ?
तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तिसऱ्यांदा यश मिळवणाप का, याचीच उत्सुकता आहे. कर्नाटकातील विजयाने काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मधल्या काळात भाजपची घोडदौड सुरू झाली होती. भारत राष्ट्र समितीने सारी ताकद पणाला लावल्याने भाजपला वातावरण तेवढे अनुकूल राहिलेले नाही. रयतूबंधू किंवा दलितबंधू या लोकप्रिय योजनांचा चंद्रशेखर राव यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात चुरस
मध्य प्रदेशमध्ये २०१८चा अपवादवगळता २००३ पासून दोन दशके भाजपची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. २०२३ च्या निवडणुकीत भाजपला सत्ता टिकवण्यासाठी शर्थ करावी लागत आहे. त्यामुळेच भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. भाजपची भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असून त्यांनी काँग्रेस राजवटीतील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारातून ऐरणीवर आणला आहे. भाजपच्या विरोधातील नाराजीचा लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.