भोपाळ / रायपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी एकाच टप्प्यात झालेल्या मतदानात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७१.१६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या व अखेरच्या टप्प्यात ६८.१५ टक्के मतदान झाले.
मध्य प्रदेशातील सर्व २३० मतदारसंघांमध्ये शुक्रवारी मतदान झाले. नक्षलग्रस्त बालाघाट, मांडला आणि दिंडोरी या जिल्ह्यांमध्ये तीन वाजेपर्यंत मतदान झाले, तर उर्वरित मतदारसंघांमध्ये सहा वाजेपर्यंत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उपलब्ध माहितीनुसार बालाघाटमधील बैहर येथे ८०.३८ टक्के, लांझी येथे ७५.०७ टक्के तर परसवाडा येथे ८१.५६ टक्के मतदान झाले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काही केंद्रीय मंत्री व भाजपचे खासदारही मैदानात असल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>> Chhattisgarh : ४० हजार कोटींची कर्जमाफी, मोफत वीज, शिक्षण व आरोग्य सुविधा; राजकीय आश्वासनांचा तिजोरीवर भार
दुसरीकडे छत्तीसगडमधील ७० मतदारसंघांमध्ये शुक्रवारी दुसऱ्या व अखेरच्या टप्प्याचे मतदान झाले. गरियाबंद जिल्ह्यातील बिंदरनवागढ मतदारसंघात सुरक्षेच्या कारणास्तव ३ वाजता मतदान संपविण्यात आले, तर उर्वरित जागांवर ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती.
छत्तीसगडमध्ये जवान शहीद
छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असताना गरियाबंद जिल्ह्यातील बडे गोबरा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये ‘आयटीबीपी’चा एक जवान शहीद झाला. मुख्य हवालदार जोिगदर सिंह असे त्यांचे नाव आहे. मतदान पार पडल्यानंतर निवडणूक पथकासह परतत असताना हा स्फोट झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
हाणामारीत काँग्रेस कार्यकर्ता ठार
मध्य प्रदेशात मतदानादरम्यान दोन गटांत संघर्षांचे काही प्रकार घडले. राजनगर मतदारसंघात दोन गटांतील हाणामारीत काँग्रेस उमेदवाराचा सहकारी ठार झाला. भाजपने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. इंदूर जिल्ह्यातील महू भागातील चकमकीत पाच जण जखमी झाले. तर मोरेना जिल्ह्यात दिमानी येथे दोन जण जखमी झाले.