नवी दिल्ली : काँग्रेसची घराणेशाही तसेच नकारात्मक राजकारणामुळे जनतेत संताप असून, भाजपवर अतूट विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशात बुधवारी प्रचार संपला असून, पंतप्रधानांनी एका संदेशाद्वारे भाजपला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
छत्तीसगडमध्ये भाजप आपली आश्वासने पूर्ण करेल, असे मोदींनी समाजमाध्यमावरील संदेशात स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे भाकीतही पंतप्रधानांनी वर्तवले. भाजपच्या सुशासनावर जनतेचा विश्वास आहे. मध्य प्रदेशला प्रगतीपथावर नेण्यात भाजप वचनबद्ध असल्याचे मध्य प्रदेशच्या मतदारांना दिलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे. राज्यात तसेच केंद्रातील एकाच पक्षाच्या सरकारच्या कामांचा अनुभव जनतेने घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मध्य प्रदेशच्या विकासाच्या दृष्टीने काँग्रेसकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.
हेही वाचा >>> बोगद्यात अडकलेल्यांच्या बचावकार्यात अडथळे; ४० मजुरांच्या सुटकेसाठी हवाई दलाची मदत
ज्योतिरादित्य विश्वासघातकी– प्रियंका गांधींचा आरोप
भोपाळ : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा उल्लेख विश्वासघातकी असा करत टीकास्त्र सोडले. जनतेने निवडून दिलेले सरकार शिंदे यांनी पाडले, असा आरोप प्रियंका यांनी दतिया येथील प्रचारसभेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वासघातकी लोक जवळ केल्याची टीकाही प्रियंकांनी केली. काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये रोजगाराची संधी उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला.
दतिया येथून भाजपकडून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे उमेदवार आहेत. त्यांच्यावरही प्रियंका यांनी टीका केली आहे, तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे जागतिक दर्जाचे कलाकार असल्याचा टोलाही लगावला.
जातनिहाय जनगणनेतून चित्र बदलेल -राहुल गांधी
बेमेतरा : जातीय जनगणना केल्यास कोणता समाज किती आहे हे समजेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी स्पष्ट केले. इतर मागासवर्गीय, दलित तसेच आदिवासींना त्यांची नेमकी संख्या किती आहे हे समजल्यावर देश बदलून जाईल. पंतप्रधान विमान प्रवास करतात, रोज महागडे कपडे घालतात. मात्र जेव्हा इतर मागासवर्गीयांना त्यांचे हक्क द्यायची वेळ येते त्या वेळी गरीब हीच जात असल्याचे पंतप्रधान सांगतात, असे राहुल म्हणाले.