भोपाळ, रायपूर : पाच राज्यांमध्ये मध्य प्रदेशच्या २३० जागा आणि छत्तीसगडमधील उर्वरित ७० जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबला.
मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपदरम्यान चुरस आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना निरनिराळय़ा योजनांच्या घोषणांच्या साहाय्याने सत्ता कायम राखण्याची आशा आहे. काँग्रेसनेही गेल्या वेळी मिळवलेली आणि दीड वर्षांत पुन्हा गमावलेली सत्ता परत मिळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपच्या प्रचाराची धुरा मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री चौहान यांनी सांभाळली. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला नक्षलग्रस्त भागांमधील २० जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी एकूण ९५८ उमेदवार रिंगणात असून मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी एस सिंग देव, राज्यातील आठ मंत्री असे मातबर रिंगणात आहेत. सत्ताधारी काँग्रेसला पुन्हा विजय मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपनेही गेल्या निवडणुकीत गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसले.
भाजप जिंकल्यास काँग्रेसच्या योजना थांबवेल! राजस्थानात राहुल गांधी यांचा इशारा
जयपूर : राजस्थानात भाजप सत्तेवर आल्यास काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना थांबवतील आणि अब्जाधीशांनाच मदत करील असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिला. त्यांनी राजस्थानात घेतलेल्या तीन प्रचारसभांमध्ये भाजपवर जोरदार टीका केली.
भाजप सत्तेत आल्यास काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या जुनी पेन्शन योजना, आरोग्य विमा योजना, अनुदानित गॅस सिलिंडर किंवा महिलांसाठी वार्षिक १० हजार रुपयांचे अनुदान यासारख्या योजना ते बंद करतील आणि पुन्हा एकदा अब्जाधीशांना मदत करतील असे ते तारानगर येथील सभेत म्हणाले. मात्र, काँग्रेस सत्तेत परत आल्यास गरीब, शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांना फायदा होईल असा दावा राहुल यांनी केला.
प्रचारासाठी राहुल जयपूरमध्ये आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दोघेही उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आम्ही राज्यात विजयी होऊ असा दावा राहुल गांधी यांनी केला.
भाजपचे अडीच लाख नोकऱ्यांचे आश्वासन
जयपूर : भाजपने गुरुवारी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांत स्वयंपाकाचा गॅस सििलडर, पाच वर्षांत लाख अडीच लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध करताना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले तर काँग्रेस सरकारचे ‘पेपरफुटी’चे प्रकरण आणि इतर कथित घोटाळय़ांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. अन्य पक्षांसाठी जाहीरनामा ही एक औपचारिकता असते. पण, भाजपसाठी विकासाची ही एक रुपरेषा आहे. जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे नड्डा म्हणाले. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेस, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू – के. चंद्रशेखर राव
आदिलाबाद (तेलंगण) : काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना मत देणे म्हणजे मत ‘वाया’ घालवण्यासारखे आहे, अशी टीका बीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात सरकार स्थापन करता येणार नाही. आगामी काळ हा प्रादेशिक पक्षांचा आहे, असा दावाही चंद्रशेखर राव यांनी केला. भाजप आणि काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सांगितले की, जातीयवादी पसरवणाऱ्या भाजपला बाजूला केले पाहिजे. भाजपला मत दिले तर ते वाया जाईल. काँग्रेसला मत दिल्यासही ते वाया जाईल. तेलंगण हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि जोपर्यंत ‘केसीआर’ जिवंत आहे तोपर्यंत ते धर्मनिरपेक्षच राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.