नवी दिल्ली : राजस्थानमध्ये शनिवारी मतदान होत असून परंपरा मोडून काँग्रेस सत्ता राखणार की, भाजप परिवर्तन करणार याची उत्सुकता असेल. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत दुफळी असल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. राजस्थान विधानसभेच्या २०० पैकी १९९ जागांवर शनिवारी मतदान होत आहे. करनापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या निधनाने तेथील निवडणूक पुढे ढकलण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही दोन्ही पक्षांनी लोकप्रिय घोषणांची उधळण केली आहे. काँग्रेसने सात आश्वासने दिली असून एक कोटी कुटुंबाना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, महिला कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंबांना वार्षिक दहा हजारांचे आर्थिक साह्य, गोधन योजनेमध्ये २ रुपये प्रति किलो शेळखरेदी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी मोफत लॅपटॉप, इंग्रजीमध्ये शिक्षण, आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी १५ लाखांचा विमा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना अशा योजनांचा समावेश आहे.

भाजपने काँग्रेसच्या आश्वासनांच्या तोडीस तोड दहा आश्वासने दिली आहेत. काँग्रेसने चार लाख रोजगारांची हमी दिली असून भाजपने अडीच लाख रोजगार देण्याचे वचन दिले आहे. केसी ते पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महिला सुरक्षा, ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना मोफत स्कुटी, महिलांना मोफत बसप्रवास, गव्हाची २७०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी, शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव न करण्याची हमी, मुलीच्या जन्मानंतर दोन लाखांचे बचतपत्र अशी आश्वासने भाजपने दिलेली आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणतीही लाट नसल्याने लोकप्रिय घोषणांमधून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा >>>शिवकुमार यांच्या सीबीआय चौकशीची परवानगी मागे; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भाजपची टीका

गेल्या पाच वर्षांतील गेहलोत सरकारचा कथित भ्रष्टाचार, दलित व महिलांवरील अत्याचार, गो-तस्करी, मुस्लिम अनुनय आदी मुद्दय़ांवरून भाजपने प्रचारामध्ये काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. गेहलोत यांचा मुलगा वैभवविरोधात ईडीह्णची चौकशी केली जात आहे. गेहलोत सरकारमधील तत्कालीन मंत्री राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत दाखवलेल्या लाल डायरीवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपनेत्यांनी गेहलोत यांना घेरले आहे. लाल डायरीमध्ये गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराच्या नोंदी असल्याचा दावा गुढा यांनी केला होता. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवरून भाजपने राजकीय लाभ मिळवण्याचाही प्रयत्न केला. अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेद पूर्णपणे मिटले नसल्याचे दिसते. पायलट यांना मुख्यमंत्री न केल्यामुळे नाराज गुर्जर मतदार भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. जाटांच्या हितासाठी गेहलोतांनी काहीच न केल्याचा आरोप जाट समाजाकडून केला जात आहे. राजस्थानमधील दोन प्रमुख समूहांच्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections in rajasthan due to internal factions amy
Show comments