भ्रष्टाचारमुक्त आणि उत्तम प्रशासनाला पर्याय नाही हाच संदेश सरकार आणि राजकीय पक्षांना चार राज्यांच्या निवडणूक निकालांवरून मिळाला आहे, या दृष्टिकोनातूनच निकालांकडे पाहावे लागेल, असे मत उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.
कमकुवत राजकीय नेतृत्व आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यात दाखविलेली उदासीनता यांनीच काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखविला, असे उद्योजिका किरण मुझुमदार-शॉ यांनी म्हटले आहे. उत्तम कारभाराच्या दर्जालाच महत्त्व
असल्याचा स्पष्ट संदेश निवडणुकीच्या निकालांवरून मिळत असल्याचे ‘असोचेम’ने म्हटले आहे.
प्रामाणिकपणा हेच उत्तम राजकारण आहे. आम आदमी पार्टीचा उदय आदर्शवादी विचारसरणीचे द्योतक आहे. प्रामाणिकपणा हे केवळ उत्तम धोरणच नव्हे तर ते उत्तम राजकारणही आहे, असे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्र यांनी ट्विट केले आहे.
आम आदमी पार्टीच्या यशाने प्रभावित झालेल्या किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या की, जनतेला पारदर्शकता आणि जबाबदारीवर आधारित भ्रष्टाचारमुक्त राजकारण हवे आहे.
आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल यांनी स्वच्छ राजकारणाची ग्वाही दिली, त्यामुळे त्यांना यशाची चव चाखता आली, असे त्यांनी ट्विट केले आहे. अर्थशास्त्रातील गुंतागुंतीच्या बाबी मतदारांना समजत नाहीत, मात्र महागाईमुळे खिशाला चाट बसला तर मतदारांची प्रतिक्रिया तीव्र असते, असे ‘असोचेम’चे सचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे.

Story img Loader