नागालॅण्डमध्ये सत्तारूढ नागा पीपल्स फ्रण्ट (एनपीएफ) पक्ष स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असून ६० सदस्यांच्या विधानसभेत या पक्षाने २२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एनपीएफचा पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री नेइफिऊ रिओ सलग सहाव्यांदा विजयी झाले असून तेच सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील असे संकेत मिळत आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार केवीसे सोगोत्सु यांचा पराभव केला. विधानसभेचे अध्यक्ष कियानिली पेसेयी यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार असू केयहो यांचा एक हजार मतांनी पराभव केला.
एनपीएफने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. नागालॅण्डमध्ये २३ फेब्रुवारी रोजी ५९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार तेनसंग सदर यांचे निधन झाल्याने एका मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
काँग्रेसने एकूण ५७ जागांवर निवडणूक लढविली असून हा पक्ष खूपच पिछाडीवर आहे. काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या असून दोन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळविला असून दोन जागांवर पक्ष आघाडीवर आहे.
नागालॅण्ड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एस. आय. जमीर हे विजयी झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवार सावी लिगिसे यांचा पराभव केला. जदने (यू) एकूण तीन जागा लढविल्या आणि त्यापैकी एका जागेवर विजय मिळविला आहे. भाजपने ११ जागा लढविल्या आणि तिझितमध्ये त्यांचा उमेदवार विजयी झाला.
लोकसभेतील खासदार सी. एम. चांग यांनी नोकसेन मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. तथापि, राज्यसभा खासदार खेकिहो झिमोमी, वनमंत्री एम. सी. कोनयाक, शिक्षणमंत्री न्यीवांग कोनयाक आणि सीएडब्ल्यूडी संसदीय सचिव तोरेचू यांना पराभव पत्करावा लागला. माजी मुख्यमंत्री आयकेएल चिशी यांनाही पराभव पत्करावा लागला.
मेघालयात पुन्हा काँग्रेसकडेच सत्ता ?
शिलाँग – मेघालयमध्ये काँग्रेसचा पुन्हा एकदा सत्तारूढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेघालयमध्ये झालेल्या निवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्री विजयी झाले आहेत. आतापर्यंत काँग्रेसने २० जागा जिंकल्या आहेत.काँग्रेसचे डी. डी. लापांग, माजी मुख्यमंत्री एस. सी. मारक आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष डोंकुपर रॉय विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाने २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत २५ जागा मिळविल्या होत्या. या वेळी त्याहून अधिक जागा पक्षाला मिळतील अशी शक्यता आहे.
विद्यमान मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी एनपीपीचे उमेदवार क्लेमण्ट मोमीन यांचा पराभव करून अमपटी जागेवर विजय मिळविला. मुकुल संगमा यांची पत्नी डी. डी. शिरा आणि भाऊ झेनिथ संगमा हे आपापल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांनी प्रत्येकी चार जागा जिंकल्या आहेत. एकूण १२२ अपक्ष उमेदवार रिंगणात होते त्यापैकी सहा अपक्ष विजयी झाले आहेत तर अन्य सात आघाडीवर आहेत. कॅबिनेट मंत्री अम्परीन लिंगडोह, एचडीआर लिंगडोह, प्रेस्टन तायनसाँग, आर. सी. लालू आणि ए. एल. हेक विजयी झाले आहेत. तर बी. एम. लानोंग आणि जे. ए. लिंगडोह हे कॅबिनेट मंत्री पराभूत झाले आहेत. हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख होपिंगस्टोन लिंगडोह हे सलग आठव्यांदा विजयी झाले आहेत.
त्रिपुरात सलग पाचव्यांदा डावी आघाडी
आगरतळा – त्रिपुरामध्ये डावी आघाडी सलग पाचव्यांदा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत डाव्या आघाडीने ११ जागा जिंकल्या असून ४४ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. डाव्या आघाडीची दोन-तृतीयांश बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.
काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला असून सात जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र आयएनपीटी आणि एनसीटीला अद्याप एकही जागा मिळालेली नाही. डाव्या आघाडीतील माकपला १० तर भाकपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. कारागृहमंत्री मणिंद्र रिआंग, अर्थमंत्री बादल चौधरी, कृषिमंत्री अघोर देबबर्मा आणि उद्योगमंत्री जितेंद्र चौधरी हे डाव्या आघाडीतील उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री माणिक सरकार हे धनपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र सरकार बरजाला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जितेंद्र सरकार विधानसभेचे माजी अध्यक्ष असून ते अलीकडेच काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत. डाव्या आघाडीने काँग्रेस, आयएनपीटी आणि एनसीटी या विरोधकांवर आघाडी घेतली आहे.
प. बंगाल पोटनिवडणूक : काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डाव्या आघाडीला प्रत्येकी एक जागा
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान मंत्री हुमायून कबीर रेजीनगर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार रबिऊल आलम चौधरी हे रेजीनगरमधून विजयी झाले आहेत.बिरभूम जिल्ह्य़ातील नलहाटी मतदारसंघातून डाव्या आघाडीचे दीपक चॅटर्जी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अब्दुर रेहमान यांचा पराभव केला. मालदा जिल्ह्य़ातील इंग्लिश बाजार मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे मंत्री कृष्णेंदू नारायण चौधरी विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाची आघाडी असताना २०११च्या निवडणुकीत काँग्रेसने या तीनही जागा जिंकल्या होत्या. मात्र किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीवरून दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा