विविध वृत्तवाहिन्यांच्या जनमत व मतदानोत्तर चाचण्यांप्रमाणे चारही राज्यांत काँग्रेसचा धुव्वा उडालाच तर नेमका काय पवित्रा घ्यायचा यावर काँग्रेसमध्ये शनिवारी युद्धपातळीवर खल सुरू होता. या निवडणुका म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम नाही, हा राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा दुरंगी सामनाही नाही इतकेच नव्हे तर लोकसभेत काँग्रेसच बाजी मारणार, असा प्रचारी सूर आळवणारी मलमपट्टी मोहीम पक्षाने प्रत्यक्ष ‘निकाल’ लागण्याआधीच सुरू केली आहे.
प्रत्यक्षात वृत्तवाहिन्यांच्या जनमत चाचण्यांनुसार चारही राज्यांत भाजप येण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. दिल्लीत ७०, मध्य प्रदेशमध्ये २३०, छत्तीसगढमध्ये ९० तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी छत्तीसगढ व मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे तेथे भाजपचीच सत्ता आल्यास काँग्रेसला फारसे दु:ख होणार नाही. परंतु दिल्ली व राजस्थानमध्ये काँग्रेसचा किल्ला ढासळळा तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विपरीत परिणाम होईल, या भीतीने पक्षाला ग्रासले आहे.
भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असे संकेत विविध चाचण्यांमधून देण्यात आले असले तरी भाजपने हुरळून जाऊ नये, कारण आम्ही या चारही राज्यांमध्ये १९९८ आणि १९९९ मध्ये विजयी झालो होतो, असे काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी ट्विट केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा लोकसभेच्या निवडणुकांवर कोणताही परिणाम होत नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानापर्यंत परिस्थिती आणि लोकांची मनस्थितीही बदलण्यास वेळ लागत नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला १९९८च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता तरीही विधानसभेत काँग्रेसने बाजी मारली होती, असेही दिग्विजयसिंग म्हणाले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये २००३च्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तरीही २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत ‘झाडू’ की झप्पी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या रूपाने पहिल्यांदाच दिल्लीकरांना तिसरा पर्याय मिळाला. दिल्लीत सर्वाधिक चर्चा याच पक्षाची असून भाजप व काँग्रेसला यथेच्छ बदनाम करण्याचा केजरीवाल यांचा डाव पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. त्यामुळे दिल्लीत आम आदमी पक्षाचा ‘झाडू’ काँग्रेस आणि भाजपची सफाई करणार काय, याकडे देशाचेही लक्ष आहे.
लोकसत्ता लाइव्ह ब्लॉग
दिल्ली, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांतील निवडणुकांचा निकाल रविवारी लागणार आहे. या निकालाचे लाईव्ह अपडेट्स रविवारी सकाळी सात वाजल्यापासून loksatta.com व Twitter.com/ LoksattaLive वर वाचकांना मिळतील. एवढंच नव्हे तर निकालासंबंधीच्या आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर स्वत: थेट देणार आहेत. त्यासाठी ट्विटरवर फॉलो करा लोकसत्ता (@LoksattaLive) आणि गिरीश कुबेर (@girishkuber).
आज दोनपर्यंत चित्र स्पष्ट
*दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील राज्य सरकारांच्या भवितव्याचा फैसला रविवारच्या मतमोजणीत लागणार आहे. मिझोराममधील मतमोजणी सोमवारी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत चारही राज्यांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
*दिल्लीत ६५ टक्क्य़ांहून अधिक, तर मिझोराममध्ये ८१ टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले आहे. राजस्थानमध्ये ७४ टक्क्य़ांहून अधिक, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ७० टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले आहे.
*भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी
यांच्या नेतृत्वाचीही ही चाचणीपरीक्षा असल्याचे मानले जाते.
हिशेबी आनंद!
रविवारी विजयाच्या उन्मादात फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप, फुलांची उधळण करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. निकालाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत विजयी उमेदवाराच्या मोबाइलवरून पाठविले जाणारे संदेश, वृत्तवाहिनी, खासगी एफएम चॅनल्सवरून प्रसारित होणाऱ्या अभिनंदनाच्या जाहिरातीच्या खर्चाची माहिती उमेदवाराला निवडणूक आयोगास सादर करावी लागेल. निवडणूक प्रचारासाठी असलेल्या १६ लाख रुपयांच्या खर्चमर्यादेत विजयोन्मादात केल्या जाणाऱ्या खर्चाचा समावेश असल्याने रविवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत विजयी उमेदवारांना आपल्या आनंदाला आवर घालावा लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा