दिल्लीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पानिपतानंतर पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांना राहुल गांधी यांच्या बचावासाठी सारवासारव करावी लागत आहे. हा निकाल राहुल गांधी यांच्याविरोधातील कौल आहे, असे म्हणता येणार नाही, असा दावा त्यांनी मंगळवारी केला. वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘या राज्यांत राहुल यांनी ना निवडणूक लढवली, ना त्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा होती, त्यामुळे ही राहुलविरोधी लाट आहे अथवा लोकांनी त्यांना नाकारले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. राहुल गांधी हे एखाद्या राज्यापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशाचे नेते आहेत. चार राज्यांतील या निवडणुका स्थानिक मुद्दय़ांवर लढल्या गेल्या, राष्ट्रीय राजकारण व राष्ट्रीय प्रश्नांशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. भाजपच्या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले जात आहे, मात्र तेही चुकीचे आहे. भाजपने व्यक्तिकेंद्रित प्रचार केला.