माया संस्कृतीचे कॅलेंडर २१ डिसेंबरला संपल्यानंतरही जगबुडी वगैरै काही झाली नाही ती सगळी भाकिते खोटी ठरली. आता नासाने आपल्यासाठी आणखी एक शुभवर्तमान सांगितले आहे ते म्हणजे २०४० मध्ये पृथ्वीजवळ येणारा २०११ एजी ५ हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाही. आतापर्यंत असे मानले जात होते हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे.
या लघुग्रहाची कक्षा न समजल्याने २०४०च्या फेब्रुवारी महिन्यात तो पृथ्वीवर आदळण्याची एक टक्क्याहून कमी शक्यता वर्तवली गेली होती, पण आता कक्षा समजल्यामुळे हा लघुग्रह आदळण्याची सुतराम शक्यता नाही असे नासाने म्हटले आहे.
हा लघुग्रह १४० मीटर व्यासाचा म्हणजे फुटबॉलच्या दोन मैदानांच्या आकाराइतका असून तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ५०० मध्ये १ अशी मानली जात होती, जर हा लघुग्रह कोसळला असता तर त्यातून १०० मेगाटन ऊर्जा बाहेर पडली असती. ही ऊर्जा दुसऱ्या महायुद्धातील अणुबॉम्बपेक्षाही अधिक असली असती.
साधारणपणे एवढय़ा आकाराचा लघुग्रह दर दहा हजार वर्षांत पृथ्वीवर आघात करू शकतो. हवाई येथील मौना किया येथे असलेल्या हवाई नॉर्थ टेलिस्कोपच्या मदतीने केलेल्या निरीक्षणांच्या आधारे हा लघुग्रह आदळणार नसल्याचे रिचर्ड वेन्सकोट यांनी सांगितले. अतिशय कमी प्रकाशमान असलेल्या या लघुग्रहाचे हे निरीक्षण जेमिनी दुर्बिणीने टिपले हे खरेतर आश्चर्यच आहे. २०, २१ व २७ ऑक्टोबर २०१२ रोजी जेमिनीने ही निरीक्षणे केली आहेत. खगोलवैज्ञानिक डेव्हिड थोलन, रिचर्ड वेन्सकोट, गॅरेट एलियट यांनी मूळ निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचे विश्लेषण नासाच्या पृथ्वीनिकट पदार्थ प्रकल्पातील वैज्ञानिकांनी केले आहे. त्याआधी या लघुग्रहाची निरीक्षणे अ‍ॅरिझोनातील माऊंट लेमन येथून नासाच्या कॅटलिना स्काय सव्‍‌र्हेमध्ये करण्यात आली होती.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा