America Presidential Election अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत आता खर्‍या अर्थाने रंगत आली आहे, कारण अमेरिकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीने पुढील राष्ट्राध्यक्षांबद्दल भविष्यवाणी केली आहे. या त्याच ज्योतिषी आहेत, ज्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन निवडणुकीतून बाहेर पडतील, असे भाकीत वर्तविले होते आणि त्यांचे हे भाकीत खरे ठरले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील सर्व माध्यम वाहिन्यांवर त्याच झळकत आहेत. अमेरिकेतील या प्रसिद्ध ज्योतिषीचे नाव आहे एमी ट्रीप. कोण आहेत एमी ट्रीप? त्यांनी पुढील राष्ट्राध्यक्षांबद्दल काय भविष्यवाणी केली? याविषयी जाणून घेऊ.

एमी ट्रिप कोण आहेत?

इंटरनेटवरील सर्वात प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून ओळखल्या जाणार्‍या एमी ट्रिप अमेरिकेतील फार मोठ्या ज्योतिषी आहेत, त्यांना स्टारहील नावानेही ओळखले जाते. त्या एक समुपदेशकदेखील आहेत; ज्याचा त्यांच्याकडे परवाना आहे, असे त्यांच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून ‘सोशल वर्क’मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च (आयएसएआर) प्रमाणित ज्योतिषी म्हणून पात्रताही प्राप्त केली आहे. नॅशनल कौन्सिल फॉर जिओकॉस्मिक रिसर्च (एनसीजीआर) आणि अमेरिकन फेडरेशन ऑफ ॲस्ट्रोलॉजर्स (एएफए) यासारख्या व्यावसायिक संस्थांबरोबरही त्या काम करतात.

त्यांनी भूतकाळातही अशा अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत, ज्या खर्‍या ठरल्या आहेत. ११ जुलै रोजी, त्यांनी बायडेन निवडणुकीतून माघार घेतील, या आशयाची एक पोस्ट केली होती. एका मायक्रोब्लॉगिंग साइटवरील वापरकर्त्याने त्यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून कधी माघार घेतील? ही तारीख विचारली असता, त्यांनी २१ जुलै असे उत्तर दिले आणि स्पष्ट केले की त्यांची भविष्यवाणी पौर्णिमेच्या प्रभावावर आधारित होती. कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, या आशयाची पोस्ट त्यांनी तब्बल चार वर्षांपूर्वी केली होती.

११ जुलै रोजी, त्यांनी बायडेन निवडणुकीतून माघार घेतील, या आशयाची एक पोस्ट केली होती.

११ ऑगस्ट २०२० रोजी, ट्रिप यांनी भाकीत केले होते की उपाध्यक्ष कमला हॅरिस २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतील. त्यांनी म्हटले होते, “चंद्र-प्लुटो यांचा मेळ कणखर स्त्रीला सूचित करतो.” या दोन्ही भविष्यवाण्या खर्‍या ठरल्या आहेत. त्यांना खात्री होती की हॅरिस यांना नामांकन मिळेल, कारण त्यांच्या ग्रहात शनीचे पुनरागमन झाल्याचे ट्रिप यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : हिजबुल्लाहच्या इस्रायलवरील हल्ल्यात १२ मुलांचा मृत्यू; गोलान हाइट्स नक्की काय? त्यावरून इस्रायल आणि सीरियामधील वाद का पेटला?

त्यांनी केलेली नवीन भविष्यवाणी काय?

त्यांच्या पूर्वीच्या काही अचूक अंदाजांनंतर, ट्रिप यांनी आगामी २०२४ च्या अमेरिकेतील निवडणुकांबद्दलही भविष्यवाणी केली आहे; ज्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. ट्रिप यांनी ‘द पोस्ट’ला सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांच्या राशीतील सूर्य त्यांना विजयापर्यंत नेणार असल्याचा दावा, ट्रीप यांनी वर्तविला आहे. त्यांनी ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दलही भाकीत वर्तविले आणि सांगितले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर १३ जुलै रोजी झालेला हल्ला, ही केवळ एक सुरुवात आहे. पुढील काळात त्यांच्यावर मोठी संकटे येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला. एमी ट्रीप यांची अखेरची भविष्यवाणी संपूर्ण देशावर केंद्रीत होती. एमी यांनी सांगितले की, ऑगस्ट महिना हा अमेरिकेसाठी कठीण असेल. अमेरिकेत भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी जो बायडन यांच्यावर भविष्यात आरोग्य संकट येण्याचेही भाकीत वर्तविले.