कर्नाटकातील कथित ज्योतिषी-वास्तुतज्ज्ञास अटक
एक्सप्रेस वृत्तसेवा, बेंगळुरू
येथील एका निवृत्त महिला न्यायाधीशास राज्यपाल पद मिळवून देण्याच्या आमिषाने ज्योतिषी व वास्तुतज्ज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या भामटय़ाने तिच्याकडून ८.८ कोटी रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा याप्रकरणी तपास करीत आहे.
ही फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या युवराज स्वामी याची भाजप नेते व्ही. सोमण्णा व उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्याबरोबरची छायाचित्रे समाजमाध्यमावरून प्रसारित झाली आहेत.
या ठकास अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे अनेक केंद्रीय मंत्र्यांची छायाचित्रे सापडली.
सहायक पोलीस आयुक्त एच.एम नागराज यांनी या प्रकरणी तपास केला असून त्यांनी सांगितले की, निवृत्त न्यायाधीशांनी या फसवणुकीबाबत २१ डिसेंबर रोजी विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण नंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले. स्वामी याने आपल्याकडून ८.८ कोटी रुपये उकळल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. राज्यपाल पद मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्याने ही रक्कम घेतली होती. सदर निवृत्त महिला न्यायाधीशाला त्याने राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवताना केंद्र सरकारमध्ये चांगल्या ओळखी असल्याचा दावा केला होता. या महिलेने स्वामी याच्यावर विश्वास ठेवून त्याला अनेक वेळा पैसे दिले. संबंधित महिलेने गुन्हे अन्वेषण शाखेला सर्व माहिती दिली असून स्वामी याच्याबरोबर बंगळुरूचे एक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दिल्ली येथे मंत्र्यांकडे रदबदली करण्यासाठी गेले होते. निवृत्त अधिकाऱ्याने या महिला न्यायाधीशाची ओळख आरोपीशी करून दिली. नंतर त्याने त्यांच्याकडून २.७५ कोटी रुपये घेतले होते. पोलिसांनी निवृत्त अधिकाऱ्याचे जाबजबाब घेतलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी सावदी यांना स्वामी यांच्या घरी बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला होता, त्याची छायाचित्रे शुक्रवारी प्रसारमाध्यमावर आली होती.
सावदी यांनी स्वामी याच्याशी अनेक वर्षांपासून ओळख असल्याचे मान्य केले आहे. व्ही सोमण्णा यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी स्वामी याला आपण नामुरा थिंडी या विजयनगरच्या हॉटेलमध्ये भेटलो होतो व त्याने घरी येण्यास सांगितले होते. राजकारणी असल्याने त्याच्या घरी गेलो व काही मिनिटे थांबलो होतो. तो लोकांकडून पैसे उकळत असल्याचे कानावर नव्हते. जेव्हा त्याचे हे प्रकरण पुढे आले तेव्हा धक्काच बसला. त्याच्याशी माझे नाव जोडले गेले आहे. त्याने माझ्या नावाचा गैरवापर केला का, याचा मीच शोध घेत आहे.
आरोपीचे राजकीय, सिनेमाक्षेत्रात प्रस्थ
युवराज स्वामी हा नगरभावीचा रहिवासी असून तो ज्योतिषी व वास्तुतज्ज्ञ असल्याचा दावा करतो. त्याचे कन्नड अभिनेते, राजकारणी यांच्याशी संबंध आहेत. त्याला गुन्हे अन्वेषण शाखेने १६ डिसेंबरला अटक केली होती. नंतर त्याने कें द्रीय मंत्र्यांच्या जवळचा असल्याचे भासवून एका तक्रादाराकडून १० कोटी रुपये घेतले होते व त्याला भाजपकडून खासदारकीचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.