पीटीआय, न्यूयॉर्क
‘भारत हा अवकाशातून अतिशय सुंदर दिसतो. माझ्या वडिलांच्या देशामध्ये नक्की येईन आणि अवकाश क्षेत्रातील अनुभव सांगेन,’ असे भावनिक उद्गार अमेरिकेच्या ‘नासा’ची अंतराळवीर आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी काढले. सुनीता विल्यम्स यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्याबरोबर अंतराळवीर बुच विल्मोर हेदेखील होते.
अवकाशातून भारत कसा दिसतो, या प्रश्नावर सुनीता भावनिक झाल्या. विल्यम्स म्हणाल्या, ‘हिमालयावरून आम्ही जेव्हा, जेव्हा गेलो, तेव्हा भारत अतिशय सुंदर दिसतो. बुच यांनी हिमालयाचे अतिशय सुरेख छायाचित्रे काढली आहेत.’ सुनीता विल्यम्स म्हणाल्या, ‘मला वाटते, की तुम्ही पूर्वेकडून येता, तेव्हा गुजरात आणि मुंबईतून गेल्यासारखे वाटते. किनाऱ्यापासून दूरवर मच्छिमारांचा ताफा पाहिल्यावर आपण इथे आल्याचे समजते. संपूर्ण भारताकडे पाहिल्यानंतर मला तेव्हा वाटले होते, की हे दिव्यांचे मोठे जाळे आहे. मोठ्या शहरातून छोट्या शहराकडे दिवे जोडत ते जाते. रात्रीचे दृश्य अगदीच अप्रतिम असे दिसते. दिवसा, हिमालय तर सर्वोत्तम. भारतात अविश्वसनीय असे दृश्य दिसते.’
सुनीता विल्यम्स यांची निरीक्षणे ४१ वर्षांपूर्वी स्क्वाड्र्न लीडर राकेश शर्मा यांनी मांडलेल्या निरीक्षणांशी जुळती आहेत. राकेश शर्मा हे भारताचे अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अवकाशात असताना फोन करून ‘अवकाशातून भारत कसा दिसतो,’ असे विचारले होते. त्यावर शर्मा यांनी ‘सारे जहाँ से अच्छा…’ असे उत्तर दिले होते.
‘भारताला भेट देईन’
सुनीता विल्यम्स म्हणाल्या, ‘वडिलांच्या देशात नक्की परत जाईन. लोकांची भेट घेईन. तसेच, पुढचे जे ‘अॅक्सिऑम मिशन’ आहे, त्या अंतर्गत भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार आहे. त्याबाबत खूप उत्सुकता आहे.’ या मोहिमेंतर्गत शुभांशू शुक्ला हे मोहिमेचे सारथ्य करणार आहेत. राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात जाणारे ते दुसरे भारतीय असतील. सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या गुजरातमधील असून, १९५८ मध्ये ते अमेरिकेत आले. सुनीता यांचा जन्म ओहियो येथे झाला.
‘अवकाशात पुन्हा जाऊ’
अवकाशात अडकून राहिल्याबद्दल बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी काही प्रमाणात स्वत:ला जबाबदार धरले. मात्र, ‘बोइंग स्टारलाइनर’ने अवकाशात पुन्हा जाऊ, असा निर्धार दोघांनीही व्यक्त केला. विल्मोर बुच म्हणाले, ‘अवकाशात अडकण्यासाठी मी स्वत:ला काहीसा जबाबदार धरतो. मी काही प्रश्न विचारू शकतो आणि त्यांच्या उत्तरांतून सत्य समोर येईल. आम्ही सगळेच जबाबदार आहोत.’ असे सांगतानाच पुन्हा अवकाशात जाण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.