पृथ्वीसारख्या खडकाळ ग्रहांच्या निर्मितीबाबतच्या पारंपरिक सिद्धांतांना वैज्ञानिकांनी आता आव्हान दिले असून त्यांच्या मते ते वेगळ्या पद्धतीने तयार झालेले आहेत.
पृथ्वीशिवाय आपल्या सौरमालेत खडकाळ स्वरूप असलेले बुध, शुक्र व मंगळ असे तीन ग्रह आहेत. त्यांचा पृष्ठभाग घन असून त्यांच्या गाभ्यात जड धातू आहेत. ते गुरू व शनी या ग्रहांपेक्षा वेगळे आहेत. गुरू व शनी हे ग्रह वायूने बनलेले आहेत. नवीन संशोधनानुसार असे खडकाळ ग्रह विश्वात इतरही ठिकाणी आहेत व पूर्वी कल्पिल्यापेक्षा त्यांची संख्याही जास्त आहे. ‘अॅस्ट्रोफिजिक्स जर्नल ऑफ लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. खगोलशास्त्रज्ञांनी ‘अल्मा’ या अतिशय प्रगत दुर्बिणीच्या मदतीने ही निरीक्षणे मांडली असून ही दुर्बीण उत्तर चिलीतील पाच हजार मीटर उंचीवरील पर्वतावर आहे. त्यांनी ‘आयएसओ ओपीएच १०२’ हा तपकिरी रंगाचा बटू तारा शोधला असून तो ताऱ्यासारखा दिसत असला तरी इतका छोटा आहे की, फार प्रखरपणे चमकू शकत नाही. पारंपरिक सिद्धांताप्रमाणे खडकाळ ग्रह हे ताऱ्याभोवतीच्या चकतीमधील सूक्ष्म कणांच्या टकरीतून तयार झाले असावेत. काजळीसारखे हे पदार्थ एकत्र घट्ट चिकटून वाढत गेले असावेत. वैज्ञानिकांच्या मते तपकिरी रंगाच्या बटू ताऱ्यांचे बाह्य़ भाग हे वेगळे आहेत. त्यांच्याभोवतीचे कण हे एकमेकांना चिकटले नसावेत कारण त्याभोवतीची चकती विरळ आहे. त्यातील कणही एकमेकांवर आदळल्यानंतर इतके वेगात फिरले असावेत की ते एकमेकांना चिकटत गेले. ‘आयएसओ ओपीएच १०२’ या ताऱ्याभोवतीच्या चकतीमधील कण हे काही मिलिमीटर आकाराइतके व दाणेदार असावेत. घन व दाणेदार असे पदार्थ तपकिरी बटू ताऱ्याच्या भोवती असलेल्या चकतीभोवतीच्या शीत भागात बनू शकत नाहीत, पण ते बनले आहेत असे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील ल्युका रिकी यांनी म्हटले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे संशोधन केले आहे. सर्व खडकाळ ग्रह तेथे तयार झाले असावेत अशी आमची खात्री नाही, पण तशी काही चिन्हे मात्र दिसत आहेत. त्यामुळे खडकाळ व घनरूपातील ग्रहांच्या निर्मितीबाबतचे आपले सिद्धांत बदलू शकतात असे त्यांनी सांगितले.
घनरूपातील ग्रहांच्या निर्मितीबाबतच्या सिद्धांतांना आव्हान
पृथ्वीसारख्या खडकाळ ग्रहांच्या निर्मितीबाबतच्या पारंपरिक सिद्धांतांना वैज्ञानिकांनी आता आव्हान दिले असून त्यांच्या मते ते वेगळ्या पद्धतीने तयार झालेले आहेत. पृथ्वीशिवाय आपल्या सौरमालेत खडकाळ स्वरूप असलेले बुध, शुक्र व मंगळ असे तीन ग्रह आहेत.
First published on: 02-12-2012 at 01:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronomers report startling find on planet formation