शनीला बहुदा आणखी एक चंद्र मिळाला असून या बर्फाळ, छोटय़ा उपग्रहाला ‘पेगी’ असे नाव देण्यात आले आहे. नासाच्या कॅसिनी अंतराळयानाने शनीच्या या नवीन चंद्राचा म्हणजेच नैसर्गिक उपग्रहाचा शोध लावला आहे. इकारस या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून पेगीला हे नाव मरे यांनी त्यांची सासू पेगी हिच्यावरून दिले असल्याचे सांगण्यात येते, शनीचे चंद्र कसे निर्माण होतात याची माहिती यातून मिळू शकते
शनीच्या बाहेरच्या कडय़ांपैकी सर्वात चमकदार कडय़ात तो अर्धा मैल अंतरात फिरत आहे. या चंद्राच्या गुरुत्वाचा परिणाम शनि ग्रहाच्या एरवी सुरळीत असलेल्या रचनेवर काही प्रमाणात परिणाम होत असावा. हा गूढ पदार्थ तेथे असल्याचा पुरावा शनीच्या बाहेरच्या चमकदार व मोठय़ा कडय़ातील काही बदलांच्या आधारे टिपण्यात आला आहे. या कडय़ाची लांबी ७५० मैल व रूंदी सहा मैल असून ते कडे अपेक्षेपेक्षा २० टक्के जास्त चमकदार दिसते. हा गोळ्यासारखा पदार्थ १५ एप्रिल २०१३ रोजी कॅसिनीच्या कॅमेऱ्यात बद्ध झाला आहे म्हणजे या गोष्टीला जवळपास वर्ष पूर्ण झाले आहे. पेगी हा उपग्रह इतका छोटा आहे की, तो कॅसिनी यानाला थेट दिसणे शक्य नाही व नासा वैज्ञानिकांना त्याचे जवळून दर्शन २०१६ मध्ये घडणार आहे कारण त्यावेळी कॅसिनी यान या चमकदार कडय़ाजवळून जाणार आहे. शनीला सध्या ५३ अधिकृत चंद्र आहेत व नऊ हंगामी चंद्र आहेत ज्यांची खात्री पटायची आहे. खगोलवैज्ञानिकांच्या मते शनिच्या कडय़ातील बर्फ कक्षेत विखुरले गेल्याने हे चंद्र बनले असावेत. शनीचे तरूण चंद्र हे लहान आहेत हा सिद्धांत मानला तर पेगी हा त्याचा नवा चंद्र आहे. हा पदार्थ कडय़ातून बाहेर पडतो व नंतर त्याचे चंद्र म्हणून अस्तित्व बनताना आम्ही कदाचित पाहत आहोत, यासारखी घटना पूर्वी कधी बघितली नव्हती असे लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाचे खगोलवैज्ञानिक कार्ल मरे यांनी सांगितले.
शनीचा आणखी एक चंद्र सापडला
शनीला बहुदा आणखी एक चंद्र मिळाला असून या बर्फाळ, छोटय़ा उपग्रहाला ‘पेगी’ असे नाव देण्यात आले आहे. नासाच्या कॅसिनी अंतराळयानाने शनीच्या या नवीन चंद्राचा म्हणजेच नैसर्गिक उपग्रहाचा शोध लावला आहे.
First published on: 17-04-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronomers witness the birth of a new moon of saturn