येत्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आमचा पाठिंबा निर्णायक ठरेल. जनता दल (संयुक्त) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असला तरी तो प्रसंगी नवी आघाडी करण्यास मागेपुढे पाहणार नाही. केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला एक तर आता बिहारला विशेष दर्जा द्यावा लागेल; अन्यथा तसा तो देणे २०१४ मधील निवडणुकीनंतर भाग पडेल, असा इशारा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी येथे दिला.
मागासवर्गीय आणि अविकसित राज्ये यांचा सहानुभूतीने विचार करणाऱ्यांकडेच केंद्रातील सत्ता जाईल, अशी ग्वाही त्यांनी येथे आयोजित केलेल्या ‘अधिकार रॅली’त दिली. ही रॅली म्हणजे नितीशकुमार यांनी केलेले शक्तिप्रदर्शन मानण्यात येत आहे. या रॅलीला मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलला आव्हान देत बिहारचे नितीशकुमार यांनी बिहारचेच विकासाचे मॉडेल (प्रारूप) खरे व सर्वाचा विकास साधणारे असल्याचा दावा केला आहे. आमच्या विकासाच्या मॉडेलमध्ये सर्वाना समाविष्ट केलेले आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रातील पुढील सरकार स्थापनेत आमचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजधानीत पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, ‘‘बिहार राज्य विकासाच्या सर्वच क्षेत्रांत मागे पडत आहे. त्यामुळे त्याला विशेष दर्जा देणे गरजेचे आहे. देशातील सर्वच मागास राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने मदत देणे गरजेचे आहे. आम्ही सर्वाना मागे टाकून पुढे जाऊ. जगापुढे एक नवे मॉडेल सादर करू. सध्या विकासाच्या मॉडेलची फार चर्चा होते आहे. आमचे विकासाचे मॉडेल हे सर्वाचा विकास साधणारे आहे व तेच भारताचे खरे विकासाचे मॉडेल ठरू शकते. आम्ही भीक मागत नाही, विशेष दर्जा हा आमचा अधिकार आहे, बिहारला तो मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा