अफगाणिस्तानमधील काबूल विमातनळाजवळ झालेल्या दोन स्फोटांमधून येथील १६० शीख आणि हिंदू अफगाणी नागरिक अगदी थोडक्यात बचावले आहेत. देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या हल्ल्यामधून अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांकांपैकी असणाऱ्या शीख आणि हिंदूंचा एक मोठा गट या हल्ल्यातून बचावलाय. सध्या या लोकांना येथील एका गुरुद्वारामध्ये आश्रय देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : पंतप्रधान मोदींचं ‘ते’ वक्तव्य तालिबानला झोंबलं; भारताला दिला इशारा

मूळचे अफगाणिस्तानचे असणारे १४५ शीख आणि १५ हिंदू नागरिक हे स्फोट झालेल्या हमिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या त्याच ठिकाणी उपस्थित होते. स्फोटाच्या अवघ्या काही तास अधी हा गट येथे उपस्थित होता. देशामधून बाहेर पडण्यासाठी काही मदत मिळतेय का याची पहाणी करण्यासाठी हे लोक विमातळाजवळच्या या परिसरामध्ये जमा झाले होते. मात्र इथे काहीच मदत मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने हे लोक परतले आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये येथे दोन मोठे स्फोट झाले.

नक्की वाचा >> काबूल विमानतळ हल्ला : “आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि…”; संतापलेल्या बायडेन यांचा हल्लेखोरांना इशारा

सुसाइड बॉम्बर्सने विमातळाच्या प्रवेशद्वाराजवळ जमलेल्या गर्दीमध्ये गाडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये विमानतळावर जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या अनेक नागरिकांचा तसेच अमेरिकन लष्कराच्या सेवेत असणाऱ्या १३ जणांचा मृत्यू झालाय. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर भारतीय सेवाभावी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयामध्ये स्फोटात जखमी झालेल्या ६० जणांवर उपचार सुरु आहेत. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधून बाहेर निघण्यासाठी धडपड करणारा हा शीख आणि हिंदूंचा मोठा गट या स्फोटांमधून थोडक्यात बचावलाय.

नक्की पाहा >> प्रेस कॉन्फरन्स झाली तालिबानची अन् ट्रोल होतायत मोदी; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

“आज काबूल विमानतळावर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच ठिकाणी हे नागरिक काल उभे होते. काल हे स्फोट झाले नाहीत यासाठी देवाचे आभारच मानायला हवेत,” असं ट्विट सिंग यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी विमानतळावरील स्फोटानंतरचे काही फोटो पोस्ट केलेत.

देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक आणि विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ एक असे दोन आत्मघाती स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली. या स्फोटांत १२ अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील आयसिस संलग्न संघटनेने (आयसिस-के) हा हल्ला केल्याचा संशय आहे. तालिबानने या हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणाखालील भागात हा हल्ला झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.

अफगाणिस्तानातील आपापल्या देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्याची अनेक देशांची मोहीम काबूल विमानतळावर अंतिम टप्प्यात आहे. या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला न करण्याची ग्वाही तालिबानने दिली होती. अमेरिकेने जाहीर केल्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत सर्व परदेशी सैन्य माघारी गेले पाहिजे, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.

Story img Loader