देशाला प्रक्षुब्ध करणाऱ्या या घटनेवर त्यांनी पहिल्यांदाच आठवडय़ानंतर जाहीर वक्तव्य केले. त्याआधी पाकिस्तानबरोबरील तणावाच्या पाश्र्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या ज्येष्ठ नागरिकांना व्हिसा देण्याची योजना बेमुदत काळासाठी लांबणीवर टाकली, तसेच पाकिस्तानच्या सर्व नऊ हॉकी खेळाडूंची परतपाठवणी केली. भारतीय हद्दीत घुसखोरी करून केलेल्या या भ्याड कृत्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सर्वसाधारण स्वरूपाचे राहू शकत नाहीत, असा इशारा मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाकिस्तानने आपली चूक मान्य केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. लष्कराच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान पत्रकारांशी बोलत होते.
पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या पर्यायांवर जाहीर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. भारतीय जवानाचे शिर कापण्याची घटना पाक सरकारला ठाऊक होती आणि पाक सरकार लष्करप्रमुख कयानींच्या पाठीशी आहे, असा आरोप परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी मंगळवारी सकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याशी नियंत्रणरेषेवरील भारत-पाक तणावाशी संबंधित घटनाक्रमाविषयी चर्चा केली.
पाकने चार वेळा उल्लंघन केले – लेफ्ट. जनरल परनाईक
भारतीय सीमेत घुसखोरी करण्यात आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त होऊन पाकिस्तानी सैन्याने पूंछमध्ये दोन जवानांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप उत्तरेकडील कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के. टी. परनाईक यांनी केला. ते म्हणाले की, पाकिस्तान आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहे. सोमवारी भारत-पाक यांच्या ब्रिगेडियर स्तरावर झालेल्या ध्वज बैठकीत भारताने लान्सनायक हेमराज सिंहचे शिर देण्याची मागणी केली. याशिवाय नियंत्रणरेषेवर पेरण्यात आलेल्या सुरुंगांचे छायाचित्रही भारताने पाकिस्तानकडे सोपविले. या बैठकीनंतर पाकिस्तानकडून चार वेळा युद्धविरामाचे उल्लंघन झाले. मंगळवारी सायंकारी पावणेसहा वाजता पाकिस्तानने चौथ्यांदा शस्त्रसंधी मोडली.
पाक नागरिकांना
व्हिसा देण्यास चाप
पाकिस्तानच्या ज्येष्ठ नागरिकांना भारतातील प्रवेशासाठी व्हिसा देण्याच्या सुविधेची अंमलबजावणी रोखण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या या सुविधेविषयी विविध सरकारी संस्थांनी स्पष्टीकरण मागविल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सीमेवरील तणाव हेच त्यामागचे खरे कारण असल्याचे मानले जात आहे. भारत-पाकदरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या व्हिसा करारानुसार अटारी सीमेवर व्हिसा देण्याची सुविधा मंगळवारपासून अमलात येणार होती.
नऊ हॉकी खेळाडूंना माघारी धाडले
हॉकी इंडिया लीगमध्ये नऊ पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असल्यामुळे टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे हॉकी इंडियाने पाकिस्तानच्या नऊ खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर : क्रीडा
‘भारताची भाषा चिथावणीखोर’
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करण्यात आल्यानंतर भारताचे लष्करप्रमुख जन. विक्रमसिंह यांनी केलेली भाषा खूप आक्रमक, चिथावणीखोर अशीच होती,असा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी मंगळवारी केला.
अखेर पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावले
भारतीय हद्दीत घुसखोरी करून दोन जवानांची हत्या आणि त्यातील एका जवानाचे शिर कापून नेण्याचे पाकिस्तानी सैन्याचे कृत्य सहन करता येण्यासारखे नाही. हे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी पाकिस्तानला ठणकावले.
First published on: 16-01-2013 at 04:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At last prime minister warn to pakistan