डेहरादून, कोलकाता, नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये गिर्यारोहण मोहिमेवर गेलेल्या दोन वेगवेगळ्या पथकांतील २१ पैकी १२ गिर्यारोहकांचा प्रतिकूल हवामानामुळे मृत्यू ओढवला आहे, तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत.
शनिवारी हिमाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या लामखागा खिंडीजवळ दोन गिर्यारोहकांचे मृतदेह आढळले होते. पश्चिम बंगालमधून मोहिमेवर निघालेल्या ११ जणांच्या पथकात या दोघांचा समावेश होता. उत्तर काशीच्या हर्शिलपासून चित्कूलकडे जाताना हे दोघे बेपत्ता झाले होते. याआधी पाच जणांचे मृतदेह शोधपथकाला आढळून आले होते. दोन जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अन्य एका गिर्यारोहण पथकातील पाच जणांचे मृतदेह बागेश्वर जिल्ह्यात आढळून आले. सुंदरडुंगा येथे भूस्खलन झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या चौघा भारवाहकांना तेथून सुरक्षित परत येणे शक्य झाले. या पथकातील एक जण बेपत्ता आहे. उत्तराखंडमध्ये १७ ऑक्टोबरपासून अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता ७५ हून अधिक झाली आहे. या दुर्घटनांत २६ जण जखमी झाले आहेत.
राज्य आपत्ती निवारण दलाचे कमांडंट नवनीत भुल्लर यांनी संडे एक्स्प्रेसला सांगितले की, बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि पथके पाठविण्यात आली आहेत, पण खराब हवामानामुळे मोहिमेत अडथळे येत आहेत. उत्तराखंडमध्ये मृत्यू ओढवलेल्या गिर्यारोहकांनी १४ ते १५ ऑक्टोबरदरम्यान हर्शिल येथून कूच केले होते. हे पथक १५ हजार फूट उंचीवर प्रतिकूल हवामानामुळे अडकून पडल्याची माहिती त्यांच्या पर्यटन व्यवस्थापकांनी आम्हाला १९ तारखेला दिली. त्यानंतर तातडीने अत्याधुनिक हलक्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांचा शोध सुरू करण्यात आला. बागेश्वरमध्ये दोन जणांचा सुरक्षित सुटका करण्यात आली असून तिसऱ्याला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पिंडारी हिमपठारावर ३४ लोक अडकले होते. यात सहा परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्या सर्वाची सुटका करण्यात आली आहे. मोहिमेच्या सुरुवातीलाच हवामान बदलल्याने त्यांनी मार्गक्रमण थांबविले होते. याशिवाय कान्फी हिमपठारावर बकऱ्या चारण्यास गेलेल्या १७ स्थानिक मेंढपाळांनाही सुरक्षित माघारी आणण्यात आले आहे. सुंदरडुंगा येथे १० जण अडकले होते. त्यापैकी चार जणांचा हिमस्खलनात मृत्यू झाला, तर दोन जण बेपत्ता झाले होते.
काश्मिरातील हिमवृष्टीत आणखी दोघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्य़ात हिमवृष्टीत अडकल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोघांची सुटका करण्यात आली. अशा रीतीने, खराब वातावरणामुळे बळी पडलेल्यांची संख्या पाचवर पोहचली आहे.
आदल्या रात्री, अनंतनाग जिल्ह्य़ातील सिंथन खिंडीत अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस, लष्कर आणि राज्य आपदा प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या बचाव पथकाने बर्फाच्छादित वातावरणातून ३० किलोमीटर मार्गक्रमण केले आणि ८ किलोमीटर पायी चालून ते घटनास्थळी पोहोचले. रविवारी पहाटे ५ वाजता घटनास्थळी एक मृतदेह आढळला, तर दुसऱ्या इसमाला परत आणत असताना तो मरण पावला. दोघांचा जीव बचावला असून त्यांच्यावर अल्पोष्णता (हायपोथर्मिया) व मानसिक धक्का यांसाठी उपचार करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
काश्मीर खोऱ्याच्या काही भागांमध्ये, विशेषत: दक्षिण काश्मीरमधील पर्वतीय भागांमध्ये शनिवारी सौम्य हिमवृष्टी झाली.