वर्षभरात १६० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांना यश आल्याची प्रतिक्रिया पोलीस महासंचालक शेष पॉल वैद यांनी दिली आहे. तसेच आम्हाला राजकीय पाठिंबा मिळाला तर अशा प्रकारची कामगिरी करण्यात आणखी हुरूप येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीरमध्ये बेरोजगार तरूणांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी सरकारने जर नोकरीच्या संधी निर्माण केल्या तर त्या तरूणांवर दहशतवादासारख्या गोष्टींचा प्रभाव पडणार नाही असेही मत वैद यांनी मांडले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काश्मीरमध्ये दहशतवाद ही समस्या मोठी आहे. ही समस्या मिटवण्यासाठी आणि तरूणांना त्याकडे वळण्यापासून रोखण्यासाठी तेथील राजकीय व्यक्तींचा पाठिंबा मिळाला तर आम्ही जास्त चांगली कामगिरी करू शकतो. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यापेक्षा तरूणाई दहशतवादाकडे वळणारच नाही याकडे लक्ष केंद्रीत करण्यावर जास्त भर देऊ शकतो असेही वैद यांनी स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये राजकीय पाठिंबा असलेली आणि मुख्यमंत्रीपद भुषवलेली माणसे बेजबादार वक्तव्ये करत असतात. भारताच्या बाजूने बोलण्याऐवजी भारताच्या विरोधात बोलतात. दगडफेक करून घोषणाबाजी करणाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक अशी उपाधी देतात याला काहीही अर्थ नाही. त्यांनी पोलिसांना आणि जवानांना सहकार्य केले पाहिजे असे म्हणत वैद यांनी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. एवढेच नाही तर सोशल मीडियाचेही मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे असेही वैद यांनी स्पष्ट केले.
‘सायबर जिहाद’ हा प्रकार बोकाळू लागला आहे. जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानातील १ हजार माणसे निवडली आणि त्यांना सांगितले की तुम्हाला काश्मीरसाठी लढा उभा करायची गरज नाही. तुम्ही तुमचे काम घरी बसून करू शकता. ‘सायबर मुजाहिदी’ असे नाव या सगळ्यांना देण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांना वैचारिक गोंधळात टाकून लढा उभारण्याचे काम या लोकांकडून केले जात असल्याची चिंताही वैद यांनी व्यक्त केली.
मी १९९० मध्ये काश्मीरमध्ये आलो, कट्टरतावाद तेव्हापासूनच काश्मीरमध्ये आहे. मात्र त्याची जागा ‘आयसिस’ आणि ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनांच्या अजेंड्याने तेव्हा व्यापली नव्हती. काश्मीर खोऱ्यातील वाढता दहशतवाद कमी करण्यासाठी केंद्र सरकारने या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. इथला बहुतांश वर्ग बेरोजगार आहे. त्याला नमाज अदा करण्यासाठी आणि मदरशात जाण्यासाठी मोबाईलचे आमिष दाखवले जाते.
इथला तरूण त्याचा बहुतांश वेळ सोशल मीडियावर घालवतो. त्यामुळे त्याला साहजिकच दहशतवाद, दहशतवादी यासंदर्भात आकर्षण वाटते. चुकीचे बाळकडू मिळाल्याने तो या सगळ्या जाळ्यात ओढला जातो. अशा तरूणांना टीव्ही दुरूस्ती, पाईप जोडणी किंवा इतर अशा प्रकारच्या कामांमध्ये गुंतवून ठेवले आणि त्याचा त्यांना चांगला मोबदला मिळाला तर ते दहशतवादाकडे वळणार नाहीत असेही वैद यांनी म्हटले.