कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी एक बस दरीत कोसळल्याने १९ ठार आणि ११ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये ३० हून अधिक लोक होते. ही बस इस्लामाबादहून क्वेट्टाला जात असताना हा अपघात झाला. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढू शकतो.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही बस क्वेट्टाजवळ आली असता, एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ती दरीत कोसळली. पाऊस आणि वाहनाच्या वेगामुळे ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. झॉब येथील सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नुरूल हक यांनी सांगितले की, जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढू शकतो. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुदुस बिजेन्जो यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही या भीषण अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खराब रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक नियमांचे उल्लंघन व खराब वाहनांमुळे पाकिस्तानात जीवघेणे अपघात होतात. गेल्या महिन्यात उत्तर बलुचिस्तानमधील किला सैफुल्ला जिल्ह्याजवळ एका घाटात वाहन कोसळल्याने एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांसह २२ जणांचा मृत्यू झाला होता.