पीटीआय, महाकुंभनगर (प्रयागराज)

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. ‘मौनी अमावास्ये’साठी संगमावर प्रचंड गर्दी झालेली असताना मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. यात ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक वैभव कृष्णा यांनी दिली.दुर्घटना घडून १२ तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर, संध्याकाळी आकडेवारी समोर आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाकुंभामध्ये ‘मौनी अमावस्या’ हा संगमस्नानासाठी सर्वांत पवित्र दिवस मानला जातो. यादिवशी साधूसंतांचे दुसरे शाही स्नानही असते. ही पर्वणी साधण्यासाठी सहा ते आठ कोटी भाविक बुधवारी प्रयागराजमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जाते. एवढी गर्दी हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा दावा राज्य सरकार आणि महाकुंभ व्यवस्थापनाकडून केला गेला होता. मात्र पहाटे दोनच्या सुमारास संगमस्थळाकडे जाण्यासाठी मोठा लोंढा निघाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जाते. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने किमान ४० मृतदेह बाहेर काढल्याचे वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार काही भाविकांनी बॅरिकेड्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही दुर्घटना घडली. सकाळनंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात यंत्रणांना यश आले व मौनी अमावस्येचे शाही स्नान सुरळीत पार पडले. अधिकृतरित्या मृतांचा आकडा जाहीर झाला नसताना किंवा तशी माहितीही दिली गेली नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर मृतांनी श्रद्धांजली वाहिली. दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारसभेतही त्यांनी पुन्हा एकदा मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले.

मी सातत्याने उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहे. मौनी अमावास्येमुळे तेथे कोट्यवधी भाविक पोहोचले आहेत. काही वेळ स्नान थांबवण्यात आले होते. आता मात्र अनेक तासांपासून भाविक स्नान करत आहेत. मी पुन्हा एकदा मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतो. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मी स्वत: आखाडा परिषदेचे प्रमुख आणि महामंडलेश्वरांसह इतर संतांशी बोललो होतो आणि आधी भाविकांना अमृतस्नान करू देण्यास संतांनी सहमती दिली होती. गर्दी कमी झाल्यानंतरच ते स्नान करतील असे त्यांनी मान्य केले होते.योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

Story img Loader