आज-काल नोकरी बदलणं ही बाब काही नवी राहिलेली नाही. एकाच कंपनीशी एकनिष्ठ राहून तिथूनच निवृत्त होण्याचे दिवस कधीच संपले. जॉब स्विच करणं ही बाब नित्याचीच आहे. आयटी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्रात हे कायमच पाहण्यास मिळतं. पुण्यात काम करणाऱ्या एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने २५ लाख वार्षिक पगार मिळतोय म्हणून बंगळुरुला जाणं पसंत केलं. मात्र आता तो पस्तावला आहे.

पुण्यातली नोकरी सोडून पश्चात्ताप

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या एका माणसाने त्याच्या जॉब स्विचचा म्हणजेच नोकरी बदलण्याचा अनुभव त्याच्या मित्राला सांगितला आहे. १८ लाख रुपये प्रति वर्ष पगार असलेल्या या माणसाला बंगळुरुत ४० टक्के पगारवाढ मिळाली त्याचं वार्षिक पॅकेज २५ लाख रुपये झालं. मात्र पुण्यात होतो तिथे छान जगत होतो असं या माणसाने त्याच्या मित्राला सांगितलं आहे. वर्षभरापूर्वी पुण्यातली नोकरी सोडली नसती तर बरं झालं असतं असं हा कॉर्पोरेट कर्मचारी त्याच्या मित्राला म्हणाला.

या कर्मचाऱ्याच्या मित्राने नेमकं काय केलं?

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या या माणसाच्या मित्राने तो अनुभव LinkedIn Post वर शेअर केला. ज्यामुळे या कर्मचाऱ्याचा नोकरी बदलण्याचा अनुभव व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पुण्यात जेव्हा हा कॉर्पोरेट कर्मचारी काम करत होता तेव्हा त्याचा वार्षिक पगार १८ लाख रुपये होता. जो बंगळुरुला गेल्यानंतर वार्षिक २५ लाख रुपये इतका झाला. मात्र वर्षभरातच आपल्या या निर्णयाबाबत त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्राकडे मी आता असा निर्णय घेऊन पस्तावलो आहे असं म्हटलं आहे.

कर्मचाऱ्याने आपल्या मित्राकडे काय म्हटलं आहे?

मला मिळणारा वार्षिक २५ लाख पगार मला पुरत नाही. कारण या ठिकाणी भाडे तत्त्वावरच्या घरात राहतो. रेंट भरमसाठ आहे. तसंच जे जागांचे मालक आहेत ते ३ ते ४ महिन्यांचे रेंट आगाऊ मागत असतात. तसंच बंगळुरुच्या रस्त्यांवरची वाहतूक कोंडी हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होतो आहे. मी पुण्याचा १५ रुपयांचा वडा-पावही मिस करतो आहे. तसंच मी पुण्यात इथल्यापेक्षा कमी पैसे मिळवत होतो पण सुखात होतो. काही पैसे बचत खाती टाकू शकत होतो असं या माणसाने त्याच्या मित्राला सांगितलं आहे. जी पोस्ट लिंक्डइन वर चर्चेत आली आहे. लोकही याबाबत चर्चा करु लागले आहेत.

सोशल मीडियावर काय चर्चा होते आहे?

वार्षिक २५ लाख, ३५ लाख ४० लाख पगारही बंगळुरुत पुरत नाही. वार्षिक ३५/४० लाख रुपये पगार हे ऐकायलाच छान वाटतं. मात्र वास्तव वेगळंच आहे. तुम्ही या ठिकाणी किमान रोज ३ ते ४ लोकांना शिव्याशाप देता. तसंच या ठिकाणी तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो. बंगळुरु इतकं महाग आहे की इतका वार्षिक पगारही पुरत नाही असं म्हणत सोशल मीडियावर लोक या बाबत व्यक्त होत आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. दुसरा एक युजर म्हणतो, २५ लाख वार्षिक पगार पुरत नाही हे जरा अति झालं यापेक्षा तुटपुंज्या पगारातही लोक गुजराण करतात. सुखात राहतात, तुझ्या मित्राला (पोस्टकर्त्याला उद्देशून) बजेट आखण्याचं प्लानिंग शिकलं पाहिजे.