ऐन स्वातंत्र्य दिन सोहळ्यात कोपरनिकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील ढिसाळ नियोजन सर्वानी अनुभवले. राष्ट्रध्वज फडकला नसताना राष्ट्रगीत म्हणून स्वातंत्र्य दिन सोहळा उरकण्याची घाई निवासी आयुक्त आभा शुक्ला यांना झाली होती. उपस्थितांनी चूक लक्षात आणून दिल्यावर निवासी आयुक्तांनी सुरक्षारक्षकास राष्ट्रध्वज असलेल्या खांबावर चढण्याची सूचना केली व दोरात बांधलेल्या राष्ट्रध्वजाची सुटका झाली. सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला व दुसऱ्यांदा राष्ट्रगीत म्हणण्यात आले!सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात येणार होती.मानवंदना देण्यास उभे राहिल्यानंतर आभा शुक्ला यांनी झेंडावंदन केले. राष्ट्रध्वजातून काही फुले खाली पडली. त्यामुळे त्यांनी लगेचच राष्ट्रगीत सुरू केले. प्रत्यक्षात राष्ट्रध्वज फडकलाच नव्हता. ही बाब लक्षात आणून दिल्यावर एक सुरक्षा कर्मचारी खांबावर चढला. सुमारे पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. उपस्थितांमध्ये याची चर्चा सुरू झाली.सुरक्षारक्षकाने राष्ट्रध्वज मोकळा केला. तो फडकल्याची खात्री झाल्यावर शुक्ला यांनी पुन्हा राष्ट्रगीत म्हणण्याचे आदेश दिले.  राष्ट्रध्वजाची गाठ व्यवस्थित न बांधल्याने हा प्रकार झाल्याचे स्पष्टीकरण सदनातील अधिकारी देत होते.  या सर्व पूर्वतयारीचा आढावा घेण्याची जबाबदारी  शुक्ला यांच्यावर होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा