पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या तरी या दोन्ही नेत्यांना एकमेकांविषयी आदर होता. नेहरूंनी वाजपेयींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली. वाजपेयी एक दिवस माझ्या जागेवर (पंतप्रधानपदावर) असतील, अशी भविष्यवाणी नेहरूंनी केली होती.
राजकारणात येण्यापूर्वी वाजपेयी हे काही वर्ष पत्रकार म्हणूनही कार्यरत होते. राष्ट्र धर्म, पांचजन्य अशा ठिकाणी त्यांनी काम केले. वाजपेयी हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अनुयायी होते. मुखर्जी यांनी १९५३ मध्ये काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवान्याची अट ठेवण्याच्या विरोधात उपोषण केले, त्याला वाजपेयी यांनी पाठिंबा दिला. १९५७ मध्ये वाजपेयी जनसंघाचे खासदार झाले.
लोकसभेत वाजपेयींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळींवरील मुद्द्यांवरुन नेहरू सरकारची सभागृहात कोंडी केली. त्यांची हिंदी भाषेवरील पकड बघून नेहरूदेखील प्रभावित झाले होते. १९५७ मध्ये नेहरूंनी परदेशी पाहुण्यांना वाजपेयींची ओळख करुन देताना ‘हा तरुण नेता एक दिवस देशाचा पंतप्रधान असेल’, असे सांगितले होते. नेहरूंची ही भविष्यवाणी ४० वर्षांनी १९९० च्या दशकात खरी ठरली.
१९७७ मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले होते. वाजपेयी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. सत्ताबदल होताच परराष्ट्र मंत्रालयातील काँग्रेसच्या काळातील वस्तू हटवण्यात आल्या. यात नेहरूंच्या फोटोचाही समावेश होता. वाजपेयी यांना परराष्ट्र मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत असताना ही बाब लक्षात आली. या ठिकाणी नेहरूंजींचे छायाचित्र होते. ते का काढले?, मला ते छायाचित्र इथेच हवे आहे, असे वाजपेयींनी सांगितले होते.