भाजपामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीचे वर्चस्व असले तरी २००२ मध्ये नरेंद्र मोदी यांना अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलीवरुन राजधर्माची आठवण करुन दिली होती. वाजपेयींचे ते पत्र अजूनही मोदींसाठी अडचणीचे ठरत आले आहे.
२००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याची आठवण करुन दिली होती.
गुजरात दंगलीनंतर एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतानाही त्यांनी मोदींना राजधर्माची आठवण करुन दिली होती. जात, वर्ण किंवा धर्माच्या आधारे भेदभाव व्हायला नको, असे वाजपेयींनी म्हटले होते. पंतप्रधान वाजपेयींनी या पत्रातून गुजरात सरकारने दंगलीनंतर राबवलेल्या उपाययोजनांवरही नाराजी व्यक्त केली होती. ‘दंगलीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमधील नागरिक पुन्हा त्यांच्या घरी परतण्यास घाबरत आहे. या नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
दंगलीतील अनेक मृतांच्या कुटुंबियांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. मृतदेहाची ओळख न पटल्याने मदत मिळण्यास विलंब होत आहे. तसेच बेपत्ता व्यक्तींचे अर्ज निकाली काढण्याचा वेगही संथ आहे. हा सर्व प्रकार चिंताजनक आहे, असेही वाजपेयींनी पत्रात म्हटले होते.